आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेतून 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टी20 क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. हा सामना भारतीय संघाने 9 विकेट्सने जिंकला. यासह भारताने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारताकडून तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी नाबाद तुफान फटकेबाजी केली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेश संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 96 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या 9.2 षटकात 1 विकेट गमावत 97 धावा केल्या आणि 9 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयासह भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला.
या सामन्यात बांगलादेशच्या 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 55 धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार ऋतुराज गायकवाड यानेही 26 चेंडूत नाबाद 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. बांगलादेशकडून रिपोन मंडल याला एक विकेट घेण्यात यश आले. त्याने भारताचा सलामीवीर यशस्वी जयसवाल याला शून्यावर झेलबाद केले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. बांगलादेशकडून यष्टीरक्षक फलंदाज जेकर अली याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 29 चेंडूत नाबाद 24 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर परवेज होसेन 23 धावा आणि रकिबुल हसन 14 धावा करून बाद झाले. इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना साई किशोर चमकला. त्याने 4 षटकात 12 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर यानेही 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.