कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शुक्रवारी (9 डिसेंबर) उपांत्यपूर्व फेरीचे पहिले दोन सामने खेळले गेले. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मागील विश्वचषकाचे उपविजेते असलेल्या क्रोएशियाने 5 वेळच्या विजेत्या ब्राझीलचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. तर, दुसऱ्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या अर्जेंटिना संघाने नेदरलँडचा पेनल्टी शूटआउटमध्येच पाडाव करत उपांत्य फेरी खेळण्याचा मान मिळवला.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्राझील व क्रोएशिया या तुल्यबळ संघात चांगली लढत होणार अशी सर्वांना अपेक्षा होती. सामना ही त्याच प्रकारे झाला. पूर्ण वेळेनंतर सामना 0-0 असा गोल शून्य बरोबरीत राहिला. अतिरिक्त वेळेत गेलेल्या सामन्याच्या पहिल्या हाफच्या इंजुरी टाईममध्ये नेमारने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 117 व्या मिनिटाला क्रोएशियासाठी पेटकोविकने गोल करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पोहोचलेल्या सामन्यात क्रोएशियासाठी गोलरक्षक लिवाकोविक पुन्हा एकदा धावून आला. त्याने अप्रतिम बचाव करत संघाला 4-2 अशा रीतीने उपांत्य फेरीत नेले. यासह ब्राझीलचा दिग्गज नेमारचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
दिवसातील दुसऱ्या सामन्यातही अशीच तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या अर्जेंटिनाला नेदरलँड्सने पेनल्टी शूटआउटपर्यंत झुंजवले. मोलिना व मेस्सी यांनी केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाकडे 82 व्या मिनिटापर्यंत 2-0 अशी आघाडी होती. मात्र, 83 व्या मिनिटाला व त्यानंतर इंजुरी टाईममध्ये वेग्रोस्टने गोल करत सामना अतिरिक्त वेळेत नेला. तिथे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने 4-3 अशी कामगिरी करत नेदरलँड्सला स्पर्धेबाहेर केले.
मंगळवारी (13 डिसेंबर) लुसेल स्टेडियम येथे पहिल्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिना व क्रोएशिया एकमेकांशी भिडतील.