ऐश्वर्य मांजरेकरची नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पसाठी निवड !

देशभरातून टॉप 50 तरुणांची निवड
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 19, 2022 17:50 PM
views 199  views

सावंतवाडी : आपल्‍याला गौरवशाली भारत घडवायचा आहे. यासाठी निःस्वार्थी नेते घडविणे आपले कर्तव्य आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे एक माध्यम आहे. सशक्त, सुदृढ आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती व संपत्ती असते. यासाठीच युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारे दि. २१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या १२ दिवसांच्या कालावधीत 'राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबीर' गांधी रिसर्च फाऊंडेशन गांधी तीर्थ, जळगाव येथे आयोजित केले आहे. या 'नॅशनल लीडरशीप कॅम्प'साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची निवड झाली आहे. ऐश्वर्य व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळचा विद्यार्थी आहे.

सदर शिबिरामध्ये क्षेत्रकार्य, मुलाखत, रोल प्ले, सामुदायिक संवाद, ग्रामीण जीवनशैली, अनुभव प्रशिक्षण कार्यशाळा, समूह कार्य, व्याख्यान, मुसाफिरी, सांस्कृतिक कार्यक्रम, कम्युनिकेशन, विविध प्रकारचे मीडिया, युवकांपुढील आव्हाने व जीवन कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास व जीवन मूल्याचे शिक्षण अशा विविध बाबींचा समावेश सदर कॅम्पमध्ये असेल.

 शिबिरामधील सहभागी व्यक्तींना कणखर नेतृत्वासाठी तयार केले जाईल. या कॅम्पचे मुख्य उद्दिष्ट महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित नेतृत्व कौशल्ये तयार करणे आणि सध्याच्या राजकीय संदर्भात त्यांची प्रासंगिकता, शांतता राजदूत विकसित करणे, पर्यावरण आणि विकास-आधारित नेतृत्व तयार करणे, तरुणांना अहिंसक समाज निर्माण करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक प्रशासन आणि धोरणाचा पाया घालणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि प्रशासनात त्यांचे नेतृत्व सुलभ करणे हे असून सदर शिबिरासाठी संपूर्ण भारतातील युवकांनी अर्ज केले होते. त्यामधून टॉप ५० तरुणांची निवड या 'नॅशनल लिडरशीप कॅम्प' साठी झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची निवड सदर लिडरशीप कॅम्पसाठी झाली आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांकडून त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.