सावंतवाडी : बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आयोजित पावले चषक १५ वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने रॉजर्स क्रिकेट क्लब बेळगावचा पराभव करून पावले चषक पटकाविला. झोया काझी मालिकावीर तर अब्दुलगनी उर्फ साझील जावेद खतिबला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने २२ षटकात ५ गडी बाद १९९ धावा केल्या. कर्णधार साझील खतीबने १२ चौकार, ३ षटकारांसह १०८ धावा करून शतक झळकवले. त्याला पार्थने नाबाद २२ तर इशान कुबडेने १८ धावा करून सुरेख साथ दिली. रॉजर्सतर्फे राजने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स क्लबने २२ षटकात ७ बाद १३३ धावाच केल्या. स्वरुप साळखेने ७ चौकारांसह ३५, झोया काझीने ३ चौकारांसह २१, केदार संभाजीचेने ३ चौकारांसह १७ धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे व पुरस्कर्ते प्रकाश पावले, आनंद झांजल (कोल्हापूर), प्रशांत कडोलकर, महेश कर्णिक, राहुल रेगे, विठ्ठल कुंडेकर, दिनेश गवी, महांतेश गवी, सुनील देसाई, गौस हाजी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एम्स क्रिकेट क्लब सावंतवाडी व उपविजेत्या रॉजर्स क्लब यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर अब्दुलगनी उर्फ साझील खतीब (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज इशान कुबडे (सावंतवाडी), उत्कृष्ट गोलंदाज रोहन पाटील (रॉजर्स), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अथर्व तोरस्कर (सावंतवाडी), उदयोन्मुख खेळाडू कैदार संभाजीचे (रॉजर्स) तर मालिकावीर झोया काझी (रॉजर्स) यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.