नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये यशची दैदिप्यमान कामगिरी

अर्चना घारेंनी केला सन्मान !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2024 11:39 AM
views 112  views

सावंतवाडी : भालावल गावातील  कु.यश परब या युवकाने नॅशनल ज्युनिअर पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप २०२४ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले‌. या चॅम्पियनशीपमध्ये त्याने ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉंगमॅन टायटल  जिंकले आहे. तसेच स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी यश परबचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. 


श्री गंगानगर, राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत ७४ की. वजनी गटात महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करताना दैदिप्यमान यश यश परबने संपादीत केले आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने एकूण ६८० कि.ग्रा. वजन उचलून स्पर्धेत ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉगमॅन टायटल त्याने जिंकले आहे. स्पर्धेदरम्यान त्याने स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. यशच्या या कामगिरीनंतर भालावल येथील त्याच्या निवासस्थानी जात सौ. अर्चना घारेंनी कौतुक करत त्याचा सन्मान केला. शाल व श्रीफळ देऊन त्याचा यथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या या यशात आई- वडीलांचा मोठा वाटा असल्याची भावना यश परब याने व्यक्त केली.  


अर्चना घारे म्हणाल्या, भालावल गावच्या या सुपुत्राचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. शिक्षणासाठी तो अंबरनाथ, ठाणे जिल्ह्यात आहे‌. शिक्षणासह तो आपला छंद जोपासत आहे. आजकाल तरूणाई व्यसनाकडे वळत असताना स्वतःच्या आरोग्याला महत्व देणारा यश सारखा तरूण इतरांसाठी आदर्शच आहे. जिद्द व चिकाटीने दैदिप्यमान यश मिळवून त्याने कोकणची मान उंचावली आहे अशी भावना कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली. यावेळी त्याचे वडील भरत परब, विनायक परब, अँड. सिद्धी परब, रामदास गवस, मयूर कामत ,वेद परब ,चंद्रशेखर परब, सिद्धेश परब,वैभव परब आदीसह भालावल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.