भारताचा लाजिरवाणा पराभव

उपांत्य सामन्यात हेल्स-बटलरने उडवला 10 गड्यांनी धुव्वा
Edited by: ब्युरो
Published on: November 10, 2022 18:05 PM
views 276  views

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी ‌(10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताला 10 गड्याने पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली.‌ यासह भारतीय संघाचे दुसऱ्या टी20 विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.‌ राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर 27 तर सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाले.‌ एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करतात तो तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुरुवातीला अंदाज घेतल्यानंतर त्याने अखेरच्या चार षटकात अक्षरशः इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली. अखेरच्या चेंडूवर बाद  होण्यापूर्वी त्याने 4 चौकार व 5 षटकारांसह 33 चेंडूवर 63 धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघ 6 बाद 168 अशी मजल मारू शकला. फलंदाजांनी उभारलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी सुरुवात केली. बटलरने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकत आपले इरादे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूने ऍलेक्स हेल्सने आक्रमण केले. दोघांनीदेखील भारतीय गोलंदाजांची पिसे काढत आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यांनी संयम व आक्रमण यांचा सुरेख मिळेल साधत फलंदाजी करत विजय इंग्लंडच्या बाजूने नेला. बटलरने नाबाद 80 तर हेल्सने 86 धावा करत इंग्लंडला दहा गड्यांनी विजय मिळवून दिला.