
देवगड : संत गाडगेबाबा अभियानात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त बापर्डे गावात शिक्षणासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून यावेळी ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा’ दिमाखदार समारोप करण्यात आला. यावर्षीच्या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे’ मानकरी ठरले ते भाव्यांश स्पोर्ट्सन यांनी यावर्षीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यावेळी बापर्डे पॅटर्न'ची जिल्हाभर चर्चा झाली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत यावर्षीचा नाविन्यपुर्ण उपक्रम लक्षवेधी ठरला.
स्वच्छता आणि सामाजिक एकात्मतेसाठी राज्यस्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर गावाने आता शिक्षणाच्या प्रसारासाठी एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. गावातील विनाअनुदानित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाला आर्थिक बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या 'ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव २०२६' या भव्य डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याने समारोप झाला. या थरारक अंतिम सामन्यात भाव्यांश स्पोर्ट्स साईश ११, सावंतवाडी संघाने विजेतेपद पटकावून अडीच लाख रुपयांच्या मानकरी ठरण्याचा बहुमान मिळवला.दिमाखदार उद्घाटन सोहळाया क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ ७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अत्यंत उत्साहात पार पडला होता. यावेळी डॉ. सुरेश जोशी, डॉ. किरण लडकत आणि उपेंद्र भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी रात्रीच्या वेळीही क्रीडाप्रेमींची आणि ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली होती, ज्यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
राजेंद्र नाईकधुरे यांच्या नेतृत्वात यशस्वी आयोजन
स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही, स्पर्धा अध्यक्ष राजेंद्र (राजू) दाजी नाईकधुरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सर्व मुंबईकर चाकरमानी आणि ग्रामस्थांनी ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पाडली. गेली १२ वर्षे मोफत शिक्षण देणाऱ्या आपल्या गावच्या शाळेसाठी खेळाच्या माध्यमातून निधी उभा करण्याचा हा 'बापर्डे पॅटर्न' संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.
अंतिम सामन्याचा निकाल आणि बक्षीस वितरण सलग पाच दिवस चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभाचा समारोप ११ जानेवारी रोजी झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक: भाव्यांश स्पोर्ट्स साईश ११, सावंतवाडी (रोख रु. २,५०,०००/- आणि भव्य चषक)द्वितीय क्रमांक: अवधूत स्पोर्ट्स, कणकवली (रोख रु. १,२५,०००/- आणि चषक)या दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याला जसलोक हॉस्पिटलचे डॉ. किरण लडकत, डॉ. मनीष कोठारी, श्री. सुहास राणे, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, संस्थेचे अध्यक्ष बाबुराव राणे, मुंबई अध्यक्ष सत्यवान नाईकधुरे आणि गावचे सरपंच संजय हनुमंत लाड यांसह अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणासाठी सामाजिक एकजूटपद्मश्री डॉ. सुधा मूर्ती आणि सुहास राणे यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांचे पाठबळ लाभलेल्या या संस्थेला मदत करण्यासाठी राबवलेला हा उपक्रम केवळ खेळ न राहता एक सामाजिक चळवळ बनली. स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारी सर्व मदत शाळेच्या शैक्षणिक कार्यासाठी आणि इमारतीच्या प्रगतीसाठी वापरली जाणार आहे. "शिक्षणाची ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी खेळाचे मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंचे आणि हे शिवधनुष्य पेलणाऱ्या बापर्डेवासीयांचे" सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.














