वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या सामन्यात विजय मिळवल्यास यजमान संघ मालिका आपल्या नावे करेल. तर, भारतीय संघाने विजय मिळवल्यास पाचव्या सामन्यातून मालिकेचा विजेता ठरेल.
पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाने भारतीय संघावर 4 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन गडी राखून विजय मिळवत त्यांनी आघाडी घेतली. भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे चौथ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा यजमान संघ प्रयत्न करेल. तर, भारतीय संघ विजयानंतर मालिका बरोबरीत नेण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारतीय संघ या सामन्यात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांच्या जागी उमरान मलिक याला संधी देण्याची शक्यता आहे. तर, वेस्ट इंडिज संघाकडून फिरकीपटू रोस्टन चेस याच्या ऐवजी एका वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश होऊ शकतो. फ्लोरिडा येथील या मैदानावर मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत सातत्याने 180 पेक्षा जास्त धावा उभारल्या गेल्या होत्या.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
वेस्ट इंडीज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय.
भारत – यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, कुलदीप यादव