
देवगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेसाठी शिरगाव हायस्कूल आणि शिरगाव क्रिकेट अकॅडमीच्या तीन उदयोन्मुख खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिरगावच्या रुद्र सावंत,संकेत जाधव आणि कौशल तोडनकर यांची जिल्हा संघासाठी निवड करण्यात आली आहे. या तीन खेळाडूंनी आपल्या कामगिरीने एक मोठी झेप घेतली आहे. रुद्र राजेंद्र सावंत, संकेत अजय जाधव आणि कौशल तोडणकर या तिघांची सिंधुदुर्ग जिल्हा चौदा वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित होणाऱ्या मानाच्या इन्व्हिटेशन लीग क्रिकेट स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळाने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून क्रिकेटसारख्या खेळात जिल्ह्याच्या संघात स्थान मिळवणे ही शिरगाव गाव, शिरगाव हायस्कूल आणि शिरगाव क्रिकेट अकॅडमीसाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. या खेळाडूंच्या यशात त्यांचे प्रशिक्षक सुधीर साटम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या दैदिप्यमान या यशाबद्दल शिरगाव हायस्कूलचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, संस्थेचे अन्य पदाधिकारी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या तिन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांचे प्रशिक्षक सुधीर साटम यांचे अभिनंदन करून खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे गावातील आणि परिसरातील नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.