
जगातील सर्वाधिक वयाचे मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांचे सोमवारी रात्री अपघातात निधन झाले. त्यांना जालंधर नजीकच्या बिआस पिंड येथील गावात एका वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचे निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते.
फौजा यांचा जन्म १ एप्रिल १९११ या दिवशी झाला. त्यांनी ८९ वर्षांचे असताना मॅरेथॉन धावण्यास सुरुवात केली. पत्नी गिआन कौर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर फौजा यांनी १९९३मध्ये भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘पत्नीसह मुलाचे निधन झाल्यामुळे आपल्याला नैराश्य आले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण धावण्याकडे लक्ष केंद्रित केले,’ असे फौजा यांनी आपल्या ‘टर्बन्ड टोरनाडो’ या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
पत्नीच्या निधनानंतर फौजा यांनी सुरुवातीस इलफोर्ड येथील पार्कमध्ये दीर्घ चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला होता. आपण खूप लहान असताना कमकुवत होतो. पाच वर्षांचे होईपर्यंत आपल्याला नीट चालताही येत नव्हते, असे ते सांगत असत. मॅरेथॉन प्रशिक्षक हरमिंदर यांच्या सूचनेनुसार फौजा यांनी चॅरिटीसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. ते पहिल्यांदा २००१मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. त्या वेळी ते ८९ वर्षांचे होते. त्या वेळी त्यांनी ४२.२ किमी अंतर ६ तास ५४ मिनिटांत पूर्ण केले होते. त्यांनी शंभर वर्षाचे असताना टोरांटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्या वेळी त्यांनी ८ तास ११ मिनिटे वेळ दिली.
काही महिन्यांतच लंडनला त्यांनी ७ तास ४९ मिनिटे अशी वेळ दिली. २००१ ते २०१२ या बारा वर्षांत ते नऊ मॅरेथॉन धावले होते. सुरुवातीस वीस मैल अवघड नसत, अखेर सहा मैल धावताना मी देवासह बोलत असे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.