मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा सीझन सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गुजरात टायटन्सला 'अच्छे दिन' दाखवणाऱ्या हार्दिक पांड्याला संघात सामील करून त्याच्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपविण्यात आलंय. तब्बल दहा वर्षे नेतृत्व करणारा रोहित शर्मा यापुढे मुंबई संघात तर असेल. मात्र, कर्णधारपद सांभाळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून फॅन्स उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबई इंडियन्सची ओळख असलेला सचिन तेंडूलकरने देखील आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार मुंबईच्या निर्णयावर सचिन तसेच संघातील काही खेळाडू देखील नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता सचिन तेंडूलकर कोणता निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.