
सावंतवाडी : माडखोल प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा सैनिक स्कूलच्या भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे माडखोल प्रभागाच्या स्पर्धा प्रथमच आंबोली येथे सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन गेळेचे सरपंच सागर ढोकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी गेळे गावाचे सरपंच सागर ढोकरे, केसरी सरपंच स्नेहल कासले केंद्रप्रमुख आर बी गावडे, चौकूळ केंद्र प्रमुख भावना गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पावसाळा संपताच जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांची लगबग सुरू होते. केंद्र, प्रभाग, तालुका आणि जिल्हा अशा विविध स्तरांवर होत असलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. “अधिक जलद, अधिक उंच, अधिक बुद्धिमान” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने प्रेरित होत केंद्रस्तरीय स्पर्धेने सुरवात होते. केंद्राच्या स्पर्धेनंतर प्रभाग स्तरीय स्पर्धा होतात. आंबोली चौकुळ सांगेली, दाणोली, आणि माडखोल या पाच केंद्राच्या एकत्रित मिळून माडखोल प्रभाग होतो. माडखोल प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा यंदा प्रथमच आंबोली येथे सैनिक स्कूल च्या भव्य मैदानावर पार पडल्या. प्रत्येक वर्षी या स्पर्धा माडखोल येथे पार पडायच्या मात्र यंदा या स्पर्धा आंबोली येथे अतिशय उत्साहात झाल्या.
उद्घाटन प्रसंगी सरपंच सावित्री पालेकर म्हणाल्या, “क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलांनी विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे यासाठी पालक व शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहन द्यावे.” केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांनी प्रस्ताविकेतून स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट केले तसेच स्पर्धेसाठी सैनिक स्कूलने मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
या स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे यंदा प्रभागाचे चॅम्पियनशिप आंबोली केंद्राने पटकावले. पाचही केंद्रातील सर्व शाळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत खेळगिरीची चमक दाखवली.
उद्घाटन कार्यक्रमास उपसरपंच विजय गवस, चौकूळ उपसरपंच आरती जाधव, पर्यावरण तज्ञ् काका भिसे, सामाजिक कार्यकर्ते विजय नॉर्वेकर, सैनिक स्कूलचे प्राचार्य एन. डी. गावडे, राऊत प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष समीर जाधव, अखिल शिक्षक संघाच्या जिल्हा पदाधिकारी तेजस्विता वेंगुर्लेकर सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलिस पाटील आदीसह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपास्थित होते. विशेष म्हणजे या प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप गावडे यांनी रुपये 10 हजार, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे व उपसरपंच विजय गवस यांनी रुपये 10 हजार,विद्या चव्हाण पोलिस पाटील यांनी 2 हजार 500, वेर्ले नं. 2 शाळेचे अश्यक्ष सुरेश गावडे यांनी रुपये 1 हजार तर विजय नॉर्वेकर यांनी रुपये 550 व सर्व स्पर्धेकांसाठी कोकम सरबत ची विशेष सोय केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गावडे, सत्यजित वेतूर्लेकर, सतिश राऊळ यांनी केले, तर आभार जावेद तांबोळी यांनी मानले.














