
सावंतवाडी : सिंधुदुर्ग परंपरा, संस्कार अन् रितीरीवाज जपणारा जिल्हा. बुद्धीवंत, विचारवंत लोक या भूमीत होऊन गेलेत, आजही आहेत. भारताला मिळालेली रत्नही याच लाल मातीत जन्माला आलीत. मात्र, या जिल्ह्यातील तरूण वाममार्गाकडे का वळतायत ? हा खरा प्रश्न आहे. अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी स्वतः पालकमंत्री ऍक्शन मोडवर आल्यानंतर आता पोलिस खातेही चांगलेच ॲक्टीव्ह झालंय. हाप्तेखोरीन बदनाम झालेल्या खाकीतील काही स्वच्छ माणसं अशा धडक कारवाईत पुढे दिसतायत. मात्र, पुन्हा प्रश्न तोच पडतो की इथली युवाई वाम मार्गाकडे का जातेय ?
सिंधुदुर्ग जिल्हा हा मनी ऑर्डवर जगणारा जिल्हा अशी एकेकाळी ओळख होती. जनरल जगन्नाथराव भोसले, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा म्हणून तो ओळखला जायचा. तदनंतर आजतागायत राज्यात माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणेंचा जिल्हा म्हणून या सिंधुदुर्गची ओळख आहे. त्यांनी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहे. गेली ४ दशक त्यांनी या जिल्ह्यासाठी वेचलीत. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा मानही त्यांनाच जातो. विकासात्मक कार्य करताना विरोधाच्या राजकारणामुळे अनेक प्रकल्पही रखडले अन् रोजगारही म्हणावा तसा निर्माण झाला नाही. जिल्ह्यात मंजूर झालेल्या एमआयडीसीत मोठे उद्योग न येण्याचं कारणही विरोधाला होणारा विरोधच आहे. यात अनेकदा सत्तापालट झाली पण, ही परिस्थिती काही फारशी बदलली नाही. आजही रोजगारासाठी चाकरमानी म्हणवले जाणारे भूमिपुत्र मुंबई, पुणे, ठाणे येथे नोकरी करत आहेत. आता त्यांच्याही तिनं पिढ्या मुंबईतच होत आल्यात. दुसरीकडे,जिल्ह्यात मोठे रोजगार देणारे उद्योग धंदे नसल्याने गोवा राज्यात जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. यात रोज ये-जा करताना अनेकांनी अपघातात जीवही गमावलेत. तर काही जिल्ह्यातच छोटे-मोठे व्यवसाय, नोकरी करत आपला चरितार्थ चालवित आहेत. मात्र, जलद श्रीमंत होण्याची हाव येथील काही युवकांना अवैध धंद्यांत खेचून वाममार्गाकडे वळवत आहे. पदवीधर, उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरूण नैराश्यातून व्यसनी झालेत. याच व्यसनापायी अनेकांनी आपले जीवन संपविल्याचीही चित्र आहेत. तर दुसरीकडे मोठ्या उद्योग धंद्याअभावी जिल्ह्यात नोकरी करून मिळणारा पगार फारच तुटपुंजा आहे. परिणामी वयाची ३५ शी ओलांडूनही अनेकांची लग्नही जमत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
साहजिकच आर्थिक उत्पन्न आणि नैराश्यतून व्यसनाधीनता. कमी काळात अधिक पैसा कमवायची हौस, हायफाय लाईफस्टाईलच्या प्रेमात पडलेली युवाई अशा अवैध धंद्यांकडे वळली आहे. रात्रंदिवस काम करून ५०० ते १००० रू. मानधनापेक्षा एका रात्रीत मारलेल्या ट्रीप मधून दिवसाला मिळणारे २ ते ३ हजार रुपये त्यांना प्रिय झालेत. कमी काळात लाखो रुपये कमवायची हाव त्यांनी लागली आहे. यामुळे आपलं शिक्षण, प्रतिष्ठा पोलिसी कारवाईची चिंता त्यांना राहीलेली नाही. त्यात खाकीतील हाप्तेखोरी याला खतपाणी घालणारी ठरली आहे. कर्नाटकातून दोडामार्ग तालुक्यातील चोरवाटांनी गांजाची गोव्यात होणारी तस्करी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमेवर असणारे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातून सऱ्हास होतेय. यात अनेक गावांची आणि रस्त्यांची नावे सांगता येतील. आता हे लोण खारेपाटण पर्यंत पोहचलय. तपासणी नाक्यावर असणारे हितसंबंध यासाठी अवैध धंदे वाईकांच्या हिताचे ठरतात. कधी भाजीतून तर कधी अन्य शक्कल लढवून तस्करी करणारे युवक ''पुष्पा'' बनू पाहत आहेत. त्यात तस्करी सह सेवन करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. चांगल्या घरातील मूलही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे यावर आता वेळीच प्रभावी उपाय होणे अपेक्षित आहेत.
'जिल्हा बँक पॅटर्न'च औषध !
अवैध धंद्यातून वाममार्गाच्या दलदलीतून या युवाई वेळीच बाहेर काढणं काळाची गरज होती. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका निश्चितचं स्वागतार्ह आहे. इतकच नव्हे तर ते संचालक असलेल्या जिल्हा बँकेत नोकर भरती जाहीर झालीय. ७३ लिपीक पदांसाठी होणाऱ्या या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी जाहीर केलय. निश्चितच ही बाब अभिनंदनीय आहे. यानंतरही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यावर त्यांचा भर आहे. ही नव्या पर्वाची सुरुवात असून आता पर्यावरणाला हानी न करणारे उद्योग, व्यवसाय, कारखाने, कंपन्या मोठ्या प्रमाणावर आणण आवश्यक आहेत. पालकमंत्री नितेश राणेंची पाऊल देखील त्या दिशेने पडताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंनी भक्कम साथ त्यांना लाभत आहे. त्यामुळे हा पॅटर्नच पिढीला बरबाद होण्यापासून रोखण्यासाठीच जालीम औषध बनलं आहे. यामुळे नैराश्यातून अन् पैशाची हाव बाळगून वाममार्गाला गेलेली युवापिढी निश्चितच चांगल्या मार्गाला जाताना दिसेल यात शंका नाही.