
साप म्हटल्यावर बर्या बर्याना घाम फुटतो. साप म्हणजे प्रत्यक्ष यमदूत आणि साप चावला की मृत्यू अटळ आहे अशा भ्रामक कल्पनेमुळे साप ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची अनेक कारणे असतील. चित्रपट माध्यम असेल ज्यामधे कधीकधी चुकीच दाखवल जात. साप या विषयाची आपल्या समाजात असलेली अंधश्रद्धा किंवा त्याबद्दलची चुकीची असलेली माहिती, तर अशा अपुऱ्या ज्ञानामुळे साप मारले जातात. सगळेच साप विषारी नसतात. आपल्याकडे आढळणारे मुख्य 4 जातीचे साप विषारी, ते चावल्यानंतर योग्य वेळी उपचार झाल्यास जीवितास धोका नसतो. बाकी सगळे निमविषारी आणि बिनविषारी ज्यामुळे माणसाच्या जीवितास धोका नसतो.
खरेतर आपण जिथे राहतो तिथेच साप वास्तव्य करून असतात मग त्यांना का घाबरायचं फक्त त्यांचा थोडा अभ्यास केला तर साप हे आपले मित्र कसे हे नक्कीच उमजेल आणि आपण त्यांना मारण्या ऐवजी त्यांच रक्षण करू आणि साप आपल्या जिवनात खूप महत्वाचे आहेत ते जर नष्ट झालेत तर माणूस जात नष्ट होण्या पासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. कारण आपल्या दैनंदिन जीवनात जी मेडिसिन आपल्याला लागतात ती 70% मेडिसिन सापाच्या विषा शिवाय बनुच शकत नाही. हे सत्य आहे. म्हणून साप या विश्वाची सर्वानी माहिती घ्या त्यांना न मारता त्यांचं रक्षण करा.
पावसाळ्यात साप जास्त का दिसतात ?
साप बाराही महिने आढळणारे सरपटणारे प्राणी आहेत. पण ते जास्त पावसाळ्यात बाहेर का दिसतात, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते ज्या सुरक्षित ठिकाणी राहत असतात, उदाहरणार्थ वाळविने बनवलेले वारूळ, उंदीर घुशीने काढलेले बीळ, किंवा कुठल्यातरी एखाद्या झाडाच्या ढोलीत, झाडावर किंवा एखाद्या झुडूपात अशा ठिकाणी ही त्यांची सुरक्षित राहण्याची जागा. पण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी पावसाचे पाणी बिळात वारुळात शिरते त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी जिथे आडोसा आहे अशा ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते आपल्याला जास्तीत जास्त घरात येण्याचे प्रमाण हे पावसाळ्यात जास्त असतं, म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि आसऱ्यासाठी आणि त्याचवेळी बेडूक उंदीर हे पण घरात येत असतात आणि अडचणीच्या जागी लपून बसतात. त्यामुळे त्यांना खाण्यासाठी साप घरात येतात. त्यामुळे आपल्याला साप पावसाळ्यात जास्त दिसतात.
आपल्या राज्यात सापाच्या 50 पेक्षाही जास्त प्रजाती आढळतात. आपल्या जिल्ह्यात सापांच्या विषारी बिनविषारी आणि निमविषारी अशा तीन प्रकारच्या 35 पेक्षा अधिक जाती आढळतात.
विषारी प्रजाती केवळ चार आपल्याला सर्रास दिसणारे.
विषारी साप मुख्य चार जातीचे
1) नाग (इंडियन स्पेक्टिकल कोब्रा) 2) घोणस.( रसल वायपर) 3) मण्यार (कॉमन क्रेट) 4) फुरसे (स्वास्केल्ड वायपर) या चार मुख्य 4 विषारी प्रजाती आहेत. आणि 5) विषारी साप जो अतिशय दुर्मिळ असा कॅस्ट्रोज कोरल स्नेक ( जो 14 वर्षांपूर्वी प्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांना मेलेला मिळालेला. त्यानंतर प्रथमच सर्पमित्र महेश राऊळ यांना जिवंत मिळाला) तसेच किंगकोब्रा,दोडामार्ग मधे आढळतो तर बांबू पिट वायपर(चापडा), हम्पनोज पिट वायपर(नाकाड्या चापडा), मलबार पिट वायपर (मलबारी चापडा) हे विषारी साप आंबोली येथे आढळतात.
- विषारी साप : 1)नाग 2) घोणस 3) मण्यार 4)फुरसे 5) कॅस्ट्रोज कोरल..6) किंग कोब्रा
- निमविषारी साप : 1)उडता सोनसर्प 2) मांजऱ्या साप,सिलोनी मांजऱ्या साप, बेंडोमचा मांजऱ्या साप, फोस्टेन मांजऱ्या साप 3) हिरवी हरणटोळ 4) तपकिरी हरणटोळ
- बिनविषारी साप : दिवड (धामण )कवड्या, तस्कर, पहाडी तस्कर, वाळा, खापर खवल्या, भारतीय अजगर, डुरक्या घोणस,विटेकरी बोवा, मांडूळ, कुकरी साप, रसेल कुकरी साप, रुखा साप, काळतोंड्या साप, नानेटी, लाल डोक्याची नानेटी, पानघोणस (दिवड,),धूळ नागीण, गवत्या साप,
साप दिसल्यावर काय कराल ?
महत्त्वाचं म्हणजे घरात साप येऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ घरामध्ये उंदीर किंवा घुशी येथील अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे घरात अडचण करू नये जेवणानंतर राहिलेल्या उष्ट,खरकट रात्रभर घरामध्ये न ठेवता लगेचच त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. एवढं करूनही घरात साप आला तर त्याला न मारता आणि घाबरून न जाता सापापासून योग्य अंतरावर उभे राहून त्याच्यावर लक्ष द्यावे. घरातील लहान मुले, वयस्कर मंडळी यांना घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावे. आपल्या जवळच्या सर्पमित्रांना फोन करून बोलावून घ्यावे.
सर्पमित्र आल्यानंतर जिथे साप असेल तिथून त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून ते त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडतील. त्याचवेळी जास्तीत जास्त सापाबद्दल माहिती जनसामान्य पर्यंत पोहोचवणे, सापाबद्दल अंधश्रद्धा काही चुकीच्या समजुती आहेत त्यावर भाष्य करून लोकांना सापाबद्दल योग्य ती माहिती देऊन साप हा प्राणी आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग आहे ते स्पष्ट करणे, सापाच्या विषापासून प्रतिसर्पविष आणि आपल्या जीवनात लागणारे 70 टक्के औषध ही सापाच्या विषा शिवाय बनवू शकत नाही हे उदाहरणासकट सर्पमित्र पटवून देतात. त्यात आपल्याकडे एखादा अति दुर्मिळ साप मिळू शकतो त्याला ओळखणे तेवढेच महत्त्व असतं. लोकांनी दिसला साप की मार काठी अशी भूमिका जर सोडली नाही तर असे दुर्मिळ साप नष्ट होऊ शकतात. त्यांचं संगोपन करणे ही पण काळाची गरज आहे. साप मारणे हा 1972 च्या कायद्या नुसार गुन्हा आहे. आणि त्यावर कमीत कमी तीन वर्षाची शिक्षा आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात सापाला कोणीच घाबरणार नाही किंवा कोणीच मारणार नाही, अशी अपेक्षा सर्प मित्र महेश राऊळ यांनी व्यक्त केली.
महेश राऊळ तुळस
सर्प मित्र तथा प्राणी मित्र
वेंगुर्ला 9405933912