पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं?

माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा
Edited by: प्रतिनिधी
Published on: September 01, 2022 07:39 AM
views 256  views

नवी दिल्ली : लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. अगदी सुरक्षेपासून प्रवासापर्यंत मंत्र्यांवर हजारो रुपये खर्च केले जातात. याशिवाय विविध भत्तेदेखील दिले जातात. अशा स्थितीत देशाच्या पंतप्रधानांवर किती खर्च केला जातो? याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेवणाचा किंवा अन्नाचा खर्च कोण करतो? अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली असता, आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतःच्या अन्नाचा खर्च स्वत: करतात. स्वत:च्या जेवणासाठी ते सरकारी बजेटमधून एक रुपयाही खर्च करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? असा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे सचिव विनोद बिहारी सिंह यांनी आरटीआयला उत्तर दिलं की, सरकारी बजेटमधून पंतप्रधानांच्या जेवणावर एक रुपयाही खर्च केला जात नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश केला होता. यानंतर २ मार्च २०१५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोदींनी संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचून सर्वांना चकित केले होते.

सध्याच्या सरकारने संसदेत सुरू असलेल्या कॅन्टीनबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना दिले जाणारे अनुदान रद्द केलं होतं. २०२१ पूर्वी संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांच्या जेवणासाठी १७ कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद होती.