ब्युरो न्यूज : सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. ज्या घरात लग्न असेल लग्नाच्या तयारीपासूनच उत्साहाचे वातावरण असते. त्यातच मुहूर्त पाहणे, लग्नाची खरेदी, प्री वेडिंग शूट, निमंत्रण पत्रिका वाटणे अशा सर्व गोष्टींची गडबड सुरू होते. आपल्या सर्व जवळच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी लग्नाला उपस्थित राहावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. पण अशा आनंदाच्या क्षणी आपल्यासाठी २४ तास सीमेवर उभ्या असणाऱ्या जवानांची आपल्याला आठवण होते का? यावर बऱ्याच जणांचे उत्तर ‘नाही’ असे असेल. पण केरळातील एका जोडप्याने मात्र या जवानांच्या कार्याचे मोल ओळखून त्यांनाही लग्नाचे निमंत्रण पाठवले आहे. हे निमंत्रण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
केरळातील एका जोडप्याने भारतीय सैन्याला पाठवलेले लग्नाचे निमंत्रण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १० नोव्हेंबर रोजी राहुल आणि कार्थीका यांचा विवाह संपन्न झाला. एका पत्राबरोबर त्यांनी लग्नाचे आमंत्रण भारतीय सैन्याला पाठवले. या पत्रात त्यांनी सैनिकांचे देशभक्ती, त्यांची निष्ठा याबद्दल त्यांचे धन्यवाद करत. सदैव भारतीय नागरिकांसाठी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांचे ते सदैव ऋणी असतील असे म्हटले आहे.
भारतीय सैन्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही निमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे. या जोडप्याच्या या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या भावनेने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.