तुम्ही खरंच 'विशेष' आहात ; केळीपासून साकारले विठूराय

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 14:59 PM
views 316  views

सिंधुदुर्ग : आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असताना राज्यातील लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालू लागले आहेत. दरम्यान परळच्या नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेतदेखील अशीच एक वारी निघत आहे. या वारीत 'विशेष विद्यार्थी' वारकरी आहेत तर त्यांनी केळ्यांची पाने आणि केळ्यांपासून विठ्ठल तयार केला आहे. विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या श्रीरंग फाऊंडेशनने या वारीचे आयोजन केले होते.


लाखो वारकरी हातात टाळ, डोक्यावर तुळस, मुखी पांडुरंगाचे नाव घेऊन पंढरपूरचा धावा करतात, त्याप्रमाणे विशेष विद्यार्थ्यांनी देखील वारीची जय्यत तयारी केली होती. यावेळी केळ्यांपासून बनविलेल्या विठ्ठलास तुळशीचा हार घालण्यात आला. 'महाराष्ट्रात विठ्ठलाचे लाखो भाविक आहेत. प्रत्येकास माऊलींना भेटण्याची इच्छा असते. आषाढीनिमित्त वारकरी जमेल त्या मार्गाने पंढरपुरला जातात. अशावेळी विशेष, दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वारीचा अनुभव घेता यावा, यासाठी दरवेळी आम्ही अशा वारीचे आयोजन करतो असे श्रीरंग संस्थेचे संस्थापक सुमीत पाटील यांनी सांगितले. निसर्गच विठ्ठल आहे आणि विठ्ठलच निसर्ग आहे हे सांगण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला. तसेच अपेक्स किडनी फाऊंडेशनच्या मदतीने अवयव दानाचे महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. अवयव दानाचे महत्व सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. समजाच्या सर्व घटकां सोबत आम्ही काम करतो पण विशेष विद्यार्थ्यांना घेऊन अवयव दानाचा प्रसार करताना आम्हाला जास्त आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया अपेक्स किडनी फाऊंडेशनच्या रंजिता परब यांनी दिली. विद्यार्थ्यांसोबत हा विठ्ठल साकारताना प्रविण बार्वेकर, अथर्व घाटोळकर, राकेश जांगिड, प्रसाद नाईक, किशन कांबळे या तरुणांनी सहकार्य केले.