ब्युरो न्यूज : गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीत तब्बल 43 वर्षानंतर पुन्हा एकदा मृत्यूचं तांडव पाहायला मिळतंय. या घटनेने 1979 च्या त्या भीषण दुर्घटनेच्या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा मच्छी धरण फुटल्यामुळं हजारो लोक आणि जनावरे मृत्युमुखी पडली होती.
मच्छी नदीवर बांधलेला शंभर वर्षाहून अधिक जुना केबल पूल रविवारी संध्याकाळी तुटल्यानं शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या अधिक आहे. दुरुस्तीनंतर हा पुल नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे या पुलावर पर्यटकांची गर्दी होती एका खाजगी ऑपरेटरनं सुमारे सहा महिने पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं. 26 ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर हा अपघात घडला.
सुमारे 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 ऑगस्ट 1979 रोजी गुजरातमध्ये मच्छी धरण फुटल्यामुळं मोठी दुर्घटना घडली होती. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी अनधिकृत आकडेवारीनुसार या धरणाने 25 हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेतले होते. मृतांच्या संख्येत एवढी मोठी तफावत असण्याचं एक कारण असं म्हटलं जातंय की योग्य नोंदी किंवा कोणतीही ओळख प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी रोगांचा प्रसार रोखण्यासाठी मृतदेह मोठ्या सामूहिक कबरीत टाकण्यात आले होते. या दुर्घटनेने अनेकांच्या अंगावर आजही काटा येतो. रविवारच्या अपघातामुळं 43 वर्षापूर्वीच्या या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.