नाग ‘कात’ टाकतोय !

कृषी संस्‍कृती बरोबरच नागांना जीवदान देण्‍याचा ट्रेंड वाढला
Edited by: स्वप्नील परब
Published on: July 29, 2025 12:25 PM
views 77  views

  •   जिल्‍ह्यात सापांच्‍या ५० प्रजाती 

सिंधुदुर्ग : श्रावण महिन्‍यातील पहिला सण नागपंचमी! अग्नी पुराण, स्कंद पुराण, नारद पुराण, गरुड पुराण आणि इतर अर्वाचीन ग्रंथांमध्येही नागपंचमीचा उल्लेख आहे. एकीकडे धार्मिक परंपरेचा बाज, कृषी संस्‍कृती तर दुसरीकडे अंध:श्रद्धा अशा चक्रात अडकलेल्‍या या सणाबाबत खर्‍या अर्थाने आज जनजागृतीची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात विविध भागांत नागपंचमीचा सण वेगवेगळ्या तर्‍हेने साजरा करण्‍याची प्रथा आहे. सणांमधील प्रथा वेगळ्या असल्‍या तरीही धार्मिक सत्‍व एकच आहे. सिंधुदुर्गात सुमारे सापांच्‍या विविध ५० प्रजाती आहेत. यामध्‍ये ६ प्रजाती या विषारी आहेत. जिल्‍ह्यात जंगलांचे प्रमाण घटत असल्‍याने सापांचे मानवी वस्‍तीतील प्रवेश वाढत आहेत. नाग, किंग कोब्रा जातीच्‍या सापांची संख्‍याही झपाट्याने वाढली आहे. तसेच सर्पमित्रांची संख्‍याही वाढत आहे. सापांना जीवदान देण्‍याचे प्रमाणही तितकेच वाढले आहे. 

पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात सापांचा प्रामुख्याने अधिवास आहे. तसेच या सापांना मारणाऱ्या लोकांवरही वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. साप वाचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होत आहे. मात्र लोक साप दिसला की घाबरतात. लोकांमध्ये सांपाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातूनच लोक साप दिसला की घाबरतात किंवा सापांना मारतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी विविध प्रकारचे साप आढळतात. आता गावोगावी सर्पमित्र झाल्याने लोकवस्तीत आलेले साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. 

 महाराष्ट्रातील आंबोली दोडामार्ग पश्चिम घाटामधील किंग कोब्राच्या अधिवास क्षेत्र आहे. राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच किंग कोब्राच्या नोंदी आहेत. अनेक सर्पमित्र संस्था वस्तीत आलेल्या सापांना जीवदान देत आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात नागराज, घोणस, फुरसे, मण्यार, मलबारी चापदा आणि बांबू चापदा या प्रजातीचे विषारी साप आढळतात. जिल्ह्यात केलेल्या संशोधनात एकूण ५० सापांच्या प्रजाती सापडतात. बिनविषारी सापडत आंबोलीत उडता सोनसर्प पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटन येतात. पावसाळ्यात नाग, धामण यासारखे साप मिलनासाठी शेतात येतात. तसेच बेडूक, उंदीर, सरडे या भक्षांच्या शोधत साप मानवी वस्तीत येतात. सापांच्या मेंदूचा विकास पूर्णपणे झालेला नसल्याने सापाच्या लक्षात काहीच राहत नाही. त्यामुळे साप दुख धरून ठेवतो वगैरे गैरसमज आहेत. तसेच सापाला माणसाची प्रतिमा ब्लॅक अँड व्हाइट स्वरूपात दिसते. त्यामुळेच सापांना ६ फुटापलीकडे अंधुक किंवा फिकट दिसायला लागते. अशावेळी सापाला कुणाला लक्षात ठेवणे अवघड जाते. सापांबद्दल गैरसमज दूर ठेवून साप निसर्गात किती महत्वाचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. 

कुठल्याच सणाची कुठलीही प्रथा कधीच कुणाच्याही वाईटासाठी नसू शकते, तर ही सर्पाला दूध घालणे आणि जीवंत सर्पाला पकडून त्याचा छळ करून पूजा करणे, ही प्रथा आपली असेल का? प्रत्येकाने हा विचार करणे महत्वाचे आहे. विरोध हा श्रद्धेला कधीच नव्हता, तो अंधश्रद्धेला आहे. सर्प हे शेतकर्‍यांचे मित्र असतात असे आपण लहानपणी पासून शिकत आलो आहोत. नागपंचमीचा सण हा याच सर्प आणि शेतकरी याच्या नात्याला वंदन करणारा सण आहे. आणि म्हणूनच या बद्दलची खरी माहिती आणि स्तुत्य भावना संगळ्यांपर्यंत पोहोचवणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सिंधुदुर्गातील अनोख्‍या प्रथा....

तोंडवळी येथील पुजारे कुटुंबीय 

येथील प्रकाश, विजय, दिलीप, भगवान, अजीत पुजारे यांचे पूर्वज मूळचे चिंदर येथील. चिंदर येथून सुखवास्तूसाठी तीन कुटुंबे तोंडवळी येथे आली. व येताना देवाचे तीन नारळ घेऊन आली. तोंडवळी वाघेश्वर मंदिरा नजीकच निवास व्यवस्था झाल्यावर या पुजारे कुटुंबीयांनी घरालगत ठेवलेल्या देवाच्या नारळा भोवती वारुळ झाल्याने सभोवताली सर्प फिरू लागल्याचे निदर्शनास आले.कालातंराने या ठिकाणी श्री नागेश्वर मंदिर उभारण्यात आले.  यानंतर हे पुजारे कुटुंबीय नागपंचमीचा हा सण या मंदिरातच साजरा करू लागले. या मंदिरात असलेल्या नागोबाच्या मूर्तीची पूजा नियमित केली जाते. दर तीन वर्षानी मंदिरामध्ये होमहवन वगैरे कार्यक्रम होतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे महिलांना प्रवेश नाही आहे. सर्व महिला मंदिरातील नागदेवतेला मंदिराबाहेरुन नमस्कार करुन नतमस्तक होतात. 

मसुर्‍याच्या ‘शेख ’ कुटुंबीयांची नागपंचमी


नागपंचमीचा सण केवळ हिंदू धर्मीय साजरे करतात असे नाही तर मालवण तालुक्यातील मसुरे गडघेरावाडी येथील इरफान, यासीन, आलम शेख कुटुंबीय भक्तिभावाने हा सण साजरा करतात. सध्या त्यांची चौथी पिढी हा सण साजरा करत आहे हे विशेष. येथील चिश्ती दरगाह नजीकच शेख कुटुंबीयांचे जुने निवासस्थान होते व घरा नजीकच एक वारुळ होते. त्या ठिकाणी असलेला सर्पास शेख यांचे कुटुंबीय नागपंचमी दिवशी दूध व लाह्यांचा प्रसाद दाखवायचे.

परबांच्या २१ कुटुंबांची नागपंचमी

घरोघरी नागपंचमीचा सण साजरा होत असताना मालवण तालुक्यातील माळगाव – हुमरोसवाडी येथील २१ कुटुंबे नागराजाच्या स्वागतासाठी उत्सुक झाली आहेत. येथील परब घराण्यातील सर्व कुटुंबे हा सण एकत्र येऊन साजरा करतात. हे एक बोधक व वेगळे उदाहरण म्हणावे लागेल. परब बांधवांचे देवघर स्वतंत्र असून ‘परब आधगृह’ या नावाच्या देवघरामध्ये हा सण साजरा केला जातो. या कुटुंबीयांचा गणपती सुद्धा या देवघरात एकत्र असतो. गणपतीसाठी भजनाचे सर्व साहित्य या परब कुटुंबीयांच्या देवघरातच असते.

‘या’ गावात दीड दिवस नाग पूजन 

मळगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील गोसावी घराण्यात गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळ दीड दिवस नागपूजन करण्याची परंपरा जपली जात आहे. प्रथेप्रमाणे यावर्षी नागपंचमीला (दि. २१ ऑगस्ट) पाच फडांच्या नागाचे पूजन तेथे करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती माहीत आहे. मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगावच्या रस्तावाडीतील गोसावी घराण्यात ही प्रथा आहे.

श्रावण सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नागपंचमी का?

भविष्यपुराणातील पंचमी कल्पात नागपंचमी विशेष करण्याचा उल्लेख आहे. समुद्र मंथनाच्या वेळी आईची आज्ञा न पाळल्यामुळे राजा जन्मेजयच्या यज्ञात तु जळून खाक होशील असा शाप नागदेवतेला देण्यात आला. शापाच्या भीतीने भयभीत झालेले नाग ब्रह्माजींच्या आश्रयाला गेले. ब्रह्माजींनी सांगितले की, महात्मा जरटकारू यांचे पुत्र जेव्हा नागा वंशात आस्तिक असतील, तेव्हा तिथे नाग सर्वांचे रक्षण करतील. हाच तो दिवस होता पंचमीचा. जेव्हा ब्रह्माजींनी नागोबाला रक्षणाचा उपाय सांगितला होता. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आस्तिक मुनींनी यज्ञात नागांना जळण्यापासून वाचवले आणि त्यांच्यावर दूध ओतले आणि जळत्या शरीराला शीतलता दिली. यावेळी नागांनी आस्तिक मुनींना सांगितले की, जो कोणी पंचमीला माझी पूजा करेल त्याला सर्पदंशाची भीती वाटणार नाही. तेव्हापासून पंचमी तिथीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते.


स्वप्नील परब 

उपसंपादक, दै. कोकणसाद