तहसीलदार धक्काबुक्की प्रकरण | संशयितांची नावे का लपवताहेत पोलिस ?

पाच संशयितांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 13, 2023 11:10 AM
views 336  views

कणकवली : मागील काही दिवसांपूर्वी अनधिकृतरित्या वाळू वाहतुक होत असलेले डंपर मालवणच्या तहसीलदारांनी पाठलाग करून थांबवले होते. ही वाळू वाहतूक अनधिकृतच होती. मात्र असे असताना तहसीलदारांना धक्काबुक्की देखील झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.


तहसीलदार श्रीधर पाटील यांनी वाळू वाहतूक करणारे डंपर थांबवून वाळू कोठून आणली? वाळू वाहतुक पास आहेत का? अशी विचारणा केल्यानंतर संबंधित डंपरचालकांनी आणि त्याठिकाणी आलेल्या दोन खासगी वाहनातील काहींनी तहसीलदारांशी हुज्जत घालत दादागिरीची भाषा वापरली. पंचनामा करण्यासही अटकाव करत तेथून पलायन केल्याप्रकरणी आचरा पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेऊन त्या पाच आरोपींना कणकवली न्यायालयात आज हजर करण्यात आले. पाचही संशयित आरोपींना १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली.


मात्र अनधिकृत वाळू वाहतूकीच्या तसेच तहसीलदार यांना धक्काबुक्की व हुज्जत घलण्यासारखा प्रकाराबाबत कारवाई असून देखील कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे देण्यास नकार दिला. त्यामुळे ही नावे गुलदस्त्यात ठेवण्यामागच नेमक कारण काय ? अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.


मालवण तालुक्यातील तेरई खाडीत वाळू उत्खनन केले जाते. त्या वाळूची विनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर मालवण तहसीलदारांचे पथक गुरुवारी रात्री ओसरगाव मार्गे असरोंडी, शिरवंडे, किर्लोस आदी भागांतून जात असताना निरोमच्या दरम्यान एका बंधार्‍यावर कणकवलीच्या दिशेने येणारे पाच डंपर त्यांना दिसले. तहसीलदारांच्या गाडीने त्यांना थांबण्याचा इशारा दिला मात्र थांबले नाहीत. त्यामुळे तहसीलदारांच्या गाडीने त्यांचा पाठलाग करुन बिडवाडी येथे त्यांना थांबवण्यात आले. तत्पूर्वीच त्यातील तीन डंपरांनी वाळूचे डंपिंग केले. त्यावेळी तहसीलदारांनी त्यांना थांबवून विचारणा केली. आपण वाळू कोठून आणली? आपल्याकडे पास आहेत का? वाळू कोठे नेली जात आहे? असे प्रश्न विचारले. दरम्यान त्याचवेळी त्या ठिकाणी दोन खासगी वाहने आली. त्या वाहनातील लोकांनी आणि डंपर चालकांनी तहसीलदारांशीच हुज्जत घालत दादागिरीची भाषा केली आणि तेथून पलयान केले.


याप्रकरणी संबंधित संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर सदर गुन्हा कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सदर संशयित आरोपी हे पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु कणकवली पोलिसांसह तपासी अधिकाऱ्यांनी देखील संशयित आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला. त्यामुळे संशयित आरोपींची नावे पोलीस रेकॉर्डवर आली, गुन्हा दाखल झाला, अटक झाली व त्यानंतर कोर्टात हजर करून कोर्टाने संबंधित संशयित आरोपींना पोलीस कोठडीही दिली. असे असताना पोलिसांकडून ही नावे गुप्त ठेवण्यामागची नेमकी कारणे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


 

तसेच सदर संशयित आरोपींची नावे माध्यमांपर्यंत देऊ नये अशा सूचना देखील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस निरीक्षकांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही नावे गुलदस्त्यात ठेवण्यामागची नेमकी कारणे काय? इतर प्रकरणांतील आरोपींची नावे पोलीस अगदी सहज स्पष्ट करतात मग या प्रकरणातील आरोपींची नावे पोलीस देत का नाहीत असे प्रश्न देखील शहरात चर्चांना उत आणत आहेत.