रायगड: छत्तीसगडच्या रायगडमध्ये अवैध दारूविक्रीसाठी एकानं भलताच मार्ग शोधून काढला आहे. कोणी दारू खरेदीसाठी आल्यावर आरोपी खोलीतील नळ सुरू करायचा आणि त्यातून येणारी दारू भरून द्यायचा. आरोपीनं घराच्या छतावर दारूची टाकी बांधली होती. त्यातून खाली पाईप आणला होता. याच पाईपमधून तो दारू विकायचा. खरसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजोरीपाली गावात हा प्रकार घडला आहे.
आरोपी मनोज जोल्हे (४०) याने त्याच्या घराच्या छतावर एक टाकी तयार केली होती. सहज दृष्टीस पडणार नाही अशा पद्धतीनं त्यानं या टाकीचं बांधकाम केलं होतं. यामध्ये दारू भरली जायची. खाली असलेल्या घरातील एका खोलीत एक पाईपलाईन आणण्यात आली होती. तीदेखील छुप्या पद्धतीनं आणण्यात आली होती. या पाईपला एक नळ होता. ग्राहक आल्यावर मनोज नळ सुरू करायचा आणि त्यांना दारू द्यायचा.
खबरीनं दिलेल्या माहितीच्या आधारे अबकारी विभागाच्या पथकानं आरोपीच्या घरावर छापा टाकला. आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संपूर्ण घराची व्यवस्थित झडती घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. पथकाला टाकीत ३० लीटर दारू सापडली.
आरोपी गेल्या दीड वर्षांपासून दारू तयार करून विकत होता. दररोज जवळपास ४० लीटर दारू विकली जायची. १५० रुपये लीटरच्या हिशोबानं तो दररोज ६ हजार रुपये कमवायचा. या कामात मनोजला त्याची पत्नी मदत करायची. त्याला ही कल्पना नेमकी कशी सुचली ते अद्याप समजू शकलेलं नाही.
एका खबरीनं याची माहिती काही दिवसांपूर्वी दिल्याचं अबकारी विभागाचे सहाय्यक आयुक्त आशिष उप्पल यांनी सांगितलं. घरात अशा प्रकारे टाकी तयार करून दारू विकली जात असेल यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. पथकानं अचानक छापा टाकल्यास आरोपी सावध होऊ शकतो याचा अंदाज त्यांनी बांधला. त्यामुळे त्यांनी अंजोरीपाली गावातील एकाला पैसे देऊन दारू खरेदीसाठी पाठवलं. त्याप्रमाणे गावातला एक तरुण मनोजच्या घरी गेला आणि दारू घेऊन आला. यानंतर अबकारी विभागाच्या पथकानं मनोजच्या घरावर छापा टाकला.