दोडामार्ग : 'अवकाश दर्शन' सारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्याचा वैज्ञानिक व भौगोलिक दृष्टीकोन तर विकसित होऊन विद्यार्थ्यांना सखोल अभ्यासाची रुची निर्माण होईल, विद्यार्थी अभ्यासू बनेल असा विश्वास व्यक्त करताना, जिल्हा परिषदच्या शालेय विध्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी विशेष आभार मानले.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होत असतांना वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्यकार्यकारी अधिकारी आदरणिय प्रजीत नायर साहेब यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पनेतून "अवकाश दर्शन" कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात सपन्न होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्याचा अवकाश दर्शन कार्यक्रम आयनोडे-सरगवे पुनवर्सन झरेबांबर शाळेत संपन्न झाला. यावेळी या उपक्रमात सहभागी झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी आकाशातून नभागणच जणू त्यांच्या भेटीला आल्याचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महेश धोत्रे साहेब उपशिक्षणाधिकारी शोभराज शेरलेकर, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ सर ,सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबवला जात आहे. 'अवकाश दर्शन' या उपक्रमामध्ये आकाश गंगा, तारे, उपग्रह, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याबाबतचे संकल्पना स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळी ७ ते ९.३० पर्यंत शाळेच्या भव्य मैदानावर थेट दुर्बिणच्या माध्यमातून अवकाश दर्शन घडविण्यात आले. यात तालुक्यातील सुमारे ३०० विद्यार्थी आणि ५० शिक्षक यांना चंद्र, शनि, गुरु, ग्रह, उपग्रह दाखवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अनेक संकल्पना समजून घेतल्या. या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देताना शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी ४.०० ते रात्री ९.३० पर्यंत चाललेल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राध्यापक प्रकाश पारखे- इस्माईल युसुफ शासकिय महाविदयालय मुंबई, प्राध्यापक नवनाथ शिंगवे - मोहिनी महाविदयालय पालघर, संदीय बेडेकर - मुंबई, गुरुनाथ शिंगवे - ठाणे, कुमार दिपक, फसाले - पालघर यांनी जबाबदारी पार पाडत सखोल मार्गदर्शन केले.
हा अवकाश दर्शन कार्यक्रम यशस्वी पार पाडावा म्हणून नियंत्रक गटशिक्षणाधिकारी नदाफ सर, व्यवस्थापक शाळा आयनोडे गोपाळ गवस व विस्तार अधिकारी दळवी, नियोजक शिक्षक संघटना प्रतिनिधी विठ्ठल गवस, दयानंद नाईक, जयसिंग खानोलकर, श्रीमती पुनम पालव, सर्व केंद्रप्रमुख ,गट साधन केंद्र कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडत कार्यक्रम यशस्वी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन पाटील यांनी केलं तर आभार रघुनाथ सोनवलकर यांनी मानले.