अधिकारी हा सुद्धा भावनाशील माणूस

अॅड नकुल पार्सेकर यांचा खास लेख
Edited by:
Published on: November 30, 2024 16:05 PM
views 295  views

गुप्त वार्ता विभाग, पुणेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील धनावडे यांच्या निवृत्ती निमित्ताने विशेष लेख

  दिवसेंदिवस बदलतं राजकारण, राजकारणाचे झपाट्याने होणारे गुन्हेगारीकरण, सायबर क्राईमचा वाढता आलेख, गुन्हे तपासातील राजकीय हस्तक्षेप , राजकीय गुन्हे तपासातील अधिकाऱ्यांच्या मर्यादा, अंतर्गत कायदा आणि सुरक्षा अशा परिस्थितीत पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना आपली सेवा निर्विघ्नपणे व शक्यतो कायद्याचे पालन करून पार पाडून समाधानाने सेवेतून निवृत्त होणे हे भाग्यचं म्हणाव लागेल.. आणि ते भाग्य आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सन्मित्र सुनील धनावडे यांना लाभलं आहे. सुमारे ३४ वर्षांच्या सेवेनंतर आज ते गुप्त वार्ता पुणे विभागातून निवृत्त होत आहेत. 

  सिंधुदुर्गात आणि विशेषतः सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना त्याची कार्यपद्धती अनेकदा जवळून अनुभवता आली. अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्र आणि मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने वारंवार संपर्क यायचा तेव्हा मला जे जाणवलं ते म्हणजे साहेब उत्तम समुपदेशक आहेत. अनेक अशी प्रकरणं, भांडण- तंटे सामोपचाराने कसे मिटवायचे  यात त्यांचा हातखंडा होता. आमच्या अटलच्या  स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते आलेले होते त्यावेळी  अवघ्या पंचवीस मिनिटांत पालकांनी मुलांशी कसं वागावं? याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे पालकही फार प्रभावित झाले होते. 

  या जिल्ह्यात अनेक विभागात जे अधिकारी आले व ज्यांची बदली होवून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याशी माझी नेहमीच मैञी.. ती मैञी टिकून राहिली कारण मी या क्षणापर्यंत कधीही चुकीचं काम घेऊन या अधिकाऱ्यांकडे गेलो नाही, जात नाही. त्यापैकी एक मा. धनावडे साहेब. माझ्या अनेक सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून येतात.  

   अधिकारी हा संवेदनशील माणूसही असतो आणि गुन्हेगार हा सुद्धा माणूस असतो. त्यामुळे प्रत्येकवेळी आपल्या अधिकाराचाचं वापर करून समस्या सुटतात असं नाही तर अनेकदा विशेषतः तरूण मुलांची गुन्हेगारीकडे वळणारी पावलं ही सकारात्मक विचार करायला लागतात. याच दिशेने साहेबांनी काम केल. यामुळेच याची दखल ही राष्ट्रीय पातळीवर पण घेतली गेली. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देवून त्यांना गौरवण्यात आलचं पण केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या हस्ते उत्कृष्ट तपासासाठीही त्यांना सन्मानित करण्यात आलं. 

  जागतिक शांतता ही आता सर्व विश्वाची गरज आहे. कोणत्याही देशाची समृद्धी ही शांततेशीच जोडली जाते. या अनुषंगाने आपलं सरकारही याबाबतीत कृतीशील आहे. याचाच एक भाग म्हणून इतर देशात या अनुषंगाने अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मा. धनावडे साहेब हे २००६/७ या काळात कोसावा  या देशात इव्हेंट मिशनसाठी गेले होते तर २०१५/१६ मध्ये भारत सरकारने त्यांची याच मिशनसाठी त्यांची निवड सुदान, साऊथ या देशासाठी केलेली होती. जिद्द, चिकाटी, कष्ट आणि सातत्य याच्या जोरावर त्यांनी ही दोन्ही मिशन यशस्वीपणे पार पाडली. 

  अनेकदा पोलीस कर्मचारी आणि व्यसन याची नेहमीच चर्चा होते.. पण धनावडे साहेब याला अपवाद होते. साध्या सुपारीच्या खाडाचही त्यांना व्यसन नव्हत. आध्यात्म म्हणजे फक्त भजन किंवा किर्तन एवढ्या पुरतचं नसतं तर आध्यात्मिक अधिष्ठान आणि माणूस म्हणून आपली कृती( कर्म) याच प्रतिबिंब आपल्या आचरणात दिसलं पाहिजे हा धनावडे साहेबांचा आग्रह होता. ते टेंबे स्वामीचें भक्त आहेत. दर गुरवारी न चुकता ते माणगावला दर्शनाला जात असतं. बदली होऊन गेल्यावरही ते येतात. आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यात जेव्हा मा. पंतप्रधान आले होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी साहेब पण आले होते. मा. प्रधानमंत्र्यांचा दौरा आटोपल्यानंतर त्यानी माणगाव गाठलं व दत्तगुरू़च दर्शन घेतल. 

  अधिकारी राञदिवस सेवेत, सारख्या बदल्या यामुळे कौटुंबिक समस्या अनेकदा निर्माण होतात पण मी प्रत्यक्ष अनुभवलय साहेबा़चं कुटुंब अतिशय सुखी, आनंदी आणि समाधानी आहे. जे समाधान आज पैशात मिळत नाही. अर्थात याचं सगळं श्रेय त्यांच्या सौभाग्यवतीचं. गृहकृत्यदक्ष गृहिणी कशी असावी? आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श माता कशी असावी? आणि आदर्श सासू कशी असावी? .. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून कसं वागावं? कसं बोलावं? याच उत्तम उदाहरण म्हणजे साहेबांच्या अर्धांगिनी. 

  साहेबांना दोन मुलगे. प्रचंड हुशार. मोठा मुलगा हा MBBS, MS, MCH  कॅन्सर सर्जन आहे. दिड वर्षापूर्वीच लग्न झाल. मी सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी होतो. सुनबाई डेंटल सर्जन आहे. 

  छोटा मुलगा जर्मनीत इंजिनिअर होवून मोठ्या औद्योगिक कंपनी नोकरी करतो. काही दिवसांनी त्याचं पण शुभमंगल होईल... आणि आज साहेब निवृत्त झाल्यावर सगळ्याच कौटुंबिक जबाबदारीतून मोकळे होतील. यापेक्षा आणखीन काय समाधान पाहिजे. 

  ज्या पोलीस खात्याकडे आपण वेगळ्या नजरेने पहातो त्याच पोलीस खात्यात असे असंख्य धनावडे असतात फक्त स्वच्छ नजरेनं पहाता आलं पाहिजे अनुभवता आलं पाहिजे. 

  साहेब, आज आपण निवृत्त होत आहात. आपण केलेली सेवा निश्चितच स्मरणात राहील. श्रीगुरुदत्ता आपणासं उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना. स्नेहप्रिया परिवाराकडून आपणास शुभेच्छा !