SUMMER SPECIAL | आला उन्हाळा..तब्येत सांभाळा !

.. अशी घ्या काळजी !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 19, 2023 12:01 PM
views 451  views

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. अनेक ठिकाणी पाऊस येत आहे. अशा वातावरणात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. आपण स्वत: आपल्यासोबत कार्यरत असलेले सर्व सहकारी आणि विद्यार्थी या सर्वांनीच आपापल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.


सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी न होऊ देणे गरजेचे आहे. घरातून येताना आणि घरी जाताना भरपूर पाणी पिऊनच बाहेर पडावे. आपल्या पोटात भरपूर पाणी असल्यास उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी. उपरणे किंवा मोठ्या रुमालाने कान व डोके बांधून निघणे अधिक चांगले. कमीतकमी वेळ उन्हात राहण्याचा प्रयत्न करावा. शक्य असलेली कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावीत. उन्हातून आल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नये. सावलीत थोडा वेळ बसून मगच पाणी प्यावे.


औषधी दुकानामध्ये मिळणारी लेमन गोळी, ORS, Glucon-D सोबत ठेवावे. घरी तयार केलेले लिंबू सरबत अथवा कोकम सरबत, ताक घेणे फायदेशीर ठरते. जेवणामध्ये काकडी, कोशिंबीर अशा पदार्थांचा समावेश करावा. शक्यतो बाहेरची / रस्त्यावरची थंड पेये, कुल्फी, आईसक्रीम टाळणे श्रेयस्कर. रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्यात पाय ठेऊन बसणे, डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवणे, तळपायाला खोबरेल तेल चोळणे या गोष्टींमुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आराम मिळतो.


सध्या येत असलेल्या बातम्या पाहता सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. मास्क वापरावा, औषधोपचार घ्यावेत, २-३ दिवस घरीच आराम करावा आणि नंतरच सेंटरला यावे.


उन्हाळ्याच्या बॅचमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येकाला पुन्हा एकदा संदेश - आला उन्हाळा, तब्येत सांभाळा...