सावंतवाडी : राजकारणात शत्रूत्वा प्रमाणे मित्रत्व देखील तेवढंच घट्ट असत याची अनेक उदाहरण आहेत. सावंतवाडी तालुक्यात महेश सारंग आणि मनोज नाईक ही अशीच जोडी, ज्यांनी दोस्तांना जपत पक्षाला बळ दिलच अन् आपलं राजकीय वलय देखील निर्माण केलं. मध्यंतरीच्या काळात काहीसा दुरावलेला हा दोस्तांना पुन्हा एकत्र आलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र दहा हत्तींच बळ निर्माण झालय.
महेश सारंग अन् मनोज नाईक सावंतवाडी तालुक्यातील राजकारणातील दोन मातब्बर नेते. मनोज नाईक हे नारायण राणे यांचे निकटवर्तीय अन् विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. मनोज नाईक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून नेतृत्व करताना त्यांच बोट धरून अनेकजण राजकारणात आले. तर दुसरीकडे महेश सारंग पंचायत समिती उपसभापती म्हणून ग्रामीण भागात कार्यरत होते. गावागावात पक्षाला बळ देत होते. मनोज नाईक, महेश सारंग यांच्या दोस्तीची सुरूवात ही इथूनच झाली. तालुक्यासह विशेषतः ग्रामीण भागात या दोघांनी आपली ताकद निर्माण केली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीत महेश सारंग भाजपवासी झाले. तर नारायण राणेंनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
या दरम्यान, कॉग्रेसमध्ये असणारे मनोज नाईक राजकारणापासून अलिप्त पहायला मिळाले. नंतरच्या काळात मनोज नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आपली ताकद त्यांनी दाखवून दिली. यावेळी पुन्हा एकदा मनोज नाईक आणि महेश सारंग हे दोन मित्र एकत्र दिसायचे. परंतु, नंतरच्या काळात मनोज नाईक राजकारणात तेवढे सक्रिय नव्हते. हे दोन मित्र त्यामुळे एकत्र दिसत नसायचे. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळत आहे. मनोज नाईक आणि महेश सारंग यांच्यातील दिल दोस्ती दुनियादारी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. गावच्या निवडणूकांसाठी हे दोन्ही दोस्त मैदानात उतरले असून त्यांच्या एकत्र येण्याने आपसुकच कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यामुळे याचा निश्चित परीणाम हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर दिसून येणार आहे.