"होय...! आम्ही इतिहास वाचून दाखवायला नव्हे, आम्ही आलोय इतिहास घडवायला..!" हाच निर्धार आणि हाच ध्यास मनाशी पक्का करून कोकणचं नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'ने अल्पावधीतच 'गरुडझेप' घेतली आहे. डिजिटल मीडिया, टीव्ही चॅनेल आणि प्रिंट मीडिया असा कोकणातल्या पहिल्याच परिपूर्ण मीडिया हाऊसचा तब्बल दर्शकपूर्तीकडे यशस्वीरित्या झोपावणारा हा प्रवास कोकणच्या या मातीतली जिद्द आणि बुलंद आत्मविश्वास याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे!
पहिली बातमी आणि पहिली ब्रेकिंग म्हणजेच तत्कालीन 'सिंधुदुर्ग LIVE' आणि आत्ताचं 'कोकणसाद LIVE' हे समीकरण आम्ही कोकणवासियांच्या हृदयात रुजवू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोकण आणि कोकणवासियांच्या प्रगतीसाठी केवळ 'बातमी देणे' हाच एकमेव पर्याय नाही, याची जाणीव 'कोकणसाद LIVE' हे चॅनल उभे करणाऱ्या आम्हा सर्व भूमिपुत्रांना आहे. त्याचमुळे बातम्यांसोबतच आम्ही 'सामाजिक बांधिलकी' जोपासून थेट समाजाशी हृदयपूर्वक नाते जोडले, ते आमच्या अभिनव सामाजिक उपक्रमांमुळे. यात आज घडीला आवर्जून उल्लेख करावा लागेल तो कोकणात पहिल्यांदाच झालेल्या 'सिटी ऑन सायकल' या इव्हेंटचा!'
'पर्यावरण रक्षण' आणि 'निरोगी जीवनाचा मूलमंत्र' देणारं हे पहिलंच अभियान आम्ही ऐतिहासिकरित्या प्रचंड यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर 'तुमचं व्हिजन आमचं मिशन' या अभियानात सिंधुदुर्गवासियांच्या तब्बल दहा हजारहून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. आणि यातील पाच हजार नागरिकांना मोफत चष्मे आणि दोन हजार रुग्णांचं मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशनही आम्ही साकार केलं. आमचा हा अश्वमेध यशोशिखरावर असतानाच दुर्दैवाने कोरोनाची महामारी आली. कोरोनाच्या या प्रचंड महामारीत अवघ जग जेव्हा थांबलं तेव्हा 'कोकणसाद LIVE' मात्र अजिबातच थांबले नाही. याही कालावधीत कोरोनाशी झुंज देत अथकपणे येथील मजुरांना अन्नदान, कोरोना जनजागृती असे समाजोपयोगी उपक्रम आम्ही सुरूच ठेवले. याच कालावधीत कोकणची ओळख असणारी लोककला म्हणजेच 'दशावतार आणि डबलबारी' या दोन्हीही कलांना आणि येथील कलावंतांना पहिलं ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ते 'कोकणसाद LIVE' ने. या आमच्या उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळातही जगभरातल्या कोकणवासियांना या लोककलांचा मनमुराद आस्वादही घेता आला आणि येथील लोक कलावंतांची उपासमार थांबवण्याची महत्त्वाची सामाजिक जबाबदारी 'कोकणसाद LIVE' ने पार पाडली. आपल्या जीवाची पर्वा न करता अथकपणे दैवी सेवा देणारे डॉक्टर्स आणि सिस्टर्स अर्थात नर्स यांचाही सन्मान करण्याचे उत्तरदायित्व आम्ही विसरलो नाही. याच दरम्यान अनेक चाकरमानी आपल्या कोकणात स्थिरावले होते. त्यांना येथील मातीचा सद्गुण कळावा व इथल्या लाल मातीतूनही सोने पिकवता येते, याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही 'कृषीक्रांती' हे महत्त्वपूर्ण अभियान हाती घेतलं. येथील विविध प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा लाखो दर्शकांपर्यंत पोहोचवून, युवा वर्गाला शेतीकडे वळविण्यासाठी आम्ही त्यांचे मत परिवर्तन करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकलो.
संपूर्ण कोकणचं मीडियात प्रतिनिधित्व करत असताना आजही बातमीच्या पलीकडची सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेवून आम्ही यशस्वीरित्या वाटचाल करत आहोत. आमच्या प्रत्येक वर्धापन दिनाला एक 'नवी थीम' असते. यावर्षी तर आम्ही 'ऑक्सिजन टुरिझम' हे अत्यंत अभिनव अभियान राबवत आहोत. कोरोनाच्या काळात अवघ्या जगाला शुद्ध आणि मुबलक ऑक्सिजनचे महत्त्व समजलं. हाच शुद्ध आणि स्वच्छ मुबलक असा ऑक्सिजन उपलब्ध आहे तो कोकण आणि गोव्यात. अत्यंत मनोहारी अशा पर्यटन स्थळांना जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आमचं हे अभिनव अभियान आम्ही साकारात आहोत. या माध्यमातून निश्चितपणे आमचं कोकण आणि गोवा जगाच्या पर्यटन नकाशावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल आणि हे अभियान कोकणवासीयांना प्रगतीचा एक नवा मार्ग उपलब्ध करून देईल, असा आम्हाला आत्मविश्वास आहे.
आज डिजिटल मीडिया, केबल टीव्ही चॅनेल आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तमाम कोकणवासीयांच्या सुख-दुःखाशी एकरूप होताना आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे की, कोकणच्या या लाल मातीची सेवा करण्याची संधी आम्हाला यानिमित्ताने उपलब्ध झाली. आज दशकपूर्तीकडे वाटचाल करत असताना या नवव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आम्ही जगभरातल्या सर्व कोकणवासियांचे हृदयापासून आभार मानतो. कारण आपल्या सर्वांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाने आणि सहकार्यामुळेच या कोकण भूमीची सेवा करण्याची ईश्वरी संधी आम्हाला प्राप्त झाली.
'जननी जन्मभूमीश्च स्वर्गातली गरीयसी!' माझी जन्मभूमी ही माझ्यासाठी स्वर्गाहूनही मोठी आहे. हीच प्रांजळ भावना मनात रुजवत, आज आमचा प्रत्येक शिलेदार या कोकणभूमीची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. सातत्याने अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून कोकणसाद संपूर्ण कोकणच्या जनमानसांच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपला सर्वांचा खंबीर आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम रहावा, हिच नवव्या वर्धापन दिनानिमित्त विधात्या चरणी प्रार्थना..!
जीवन में असली उड़ान अभी बाकी है,
हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है,
अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,
अभी तो नापने के लिए सारा आसमान बाकी है!
तमाम कोकणवासियांना सुख, समृद्धी आणि निरामय आयुष्यासाठी आमची हृदयपूर्वक शुभेच्छा...! धन्यवाद...!!!
सागर चव्हाण
मुख्य संपादक