सिंधुदुर्गनगरी : "सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची दोषसिद्धी" या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक, नकारात्मक मापदंड (Parameters) इत्यादींच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधून जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील दाखल गुन्हयांची माहिती विचारात घेऊन वाषिक गुन्हेगारीच्या आधारावर अ-श्रेणी, ब- श्रेणी, क श्रेणी तयार करण्यात आलेली होती. तीन वेगवेगळया श्रेणीतील सर्वोकृष्ट पोलीस घटक निवडीसाठी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली होती. या समितीने सत्र न्यायलयात चालणाऱ्या खटल्यांच्या दोषसिध्दी या सदराखाली सिंधुदुर्ग पोलीस दलास राज्यात प्रथम दिलेला आहे.
भविष्यातही सत्र न्यायालय व प्रथमवर्ग न्यायालयामध्ये चालणाऱ्या खटल्यांचे पृथक्करण व न्यायालयाचे पटलावर नियमित चालणारे खटले यांचेवर पर्यवेक्षण करण्याकरीता TMC (Trial Monitoring Cell) ची स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, यांनी दिलेली आहे.
"सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची दोषसिद्धी" या सदराखाली कामगिरीमध्ये योगदान असलेल्या सर्व सरकारी अभियोक्ता, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, तपासिक अधिकारी, पैरवी अधिकारी यांचे अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी अभिनंदन केलेले आहे.
राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थाः राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी ,अंमलदार यांना प्रोत्साहित करणे इत्यादी हेतु साध्य करण्यासाठी सन 2021 पासून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधून सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाकडून प्रदान करण्यात येतो.