शिवजयंतीनिमित्त सिंधू रनरची सिंधुदुर्ग किल्ला ते सावंतवाडी रन

तब्बल 65 किमीचं अंतर | 25 पेक्षा जास्त धावक
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 11, 2023 19:44 PM
views 247  views

सावंतवाडी : अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या राजाचे नाव आदरस्थानी आहे, अश्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी केली जाते. याच निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधू रनर टीम एक आगळा वेगळा उपक्रम राबवणार आहे. यंदा शिवजयंती निमित्त सिंधू रनर टीमने सिंधुदुर्ग किल्ला (मालवण) ते सावंतवाडी (आरमार ) सुमारे ६५ किलोमीटर अंतर रन करण्याचे योजिले आहे.


आपल्या जिल्ह्याला एक आगळावेगळा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तो म्हणजे जगात पहिल्यादा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गे शत्रूवर नजर ठेऊन त्याला आक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी आरमार उभारले.  त्याची मुहूर्तमेढ म्हणजे आपला सिंधुदुर्ग किल्ला. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावच्या काळाकभिन्न खडकावर हा किल्ला महाराष्ट्राचे पहिले अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी बांधला. आज जवळपास ३५० पेक्षा जास्त वर्षे लोटली तरीही महाराजांचा हा जलदुर्ग अभेद्य आणि एवढी वादळे आणि लाटांचा मारा सोसून पण दिमाखात उभा आहे.


१९ फेब्रुवारी २०१३ रोजी रात्री ००:३० वाजता धावत शिवज्योत घेऊन मालवणवरून निघतील. नंतर चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, झाराप मार्गे १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी ९:३० पर्यंत सावंतवाडी राजवाडा येथे पोचतील. नंतर सावंतवाडीत होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन पुन्हा सावंतवाडी राजवाडा येथे रनची समाप्ती होईल. सुमारे २० ते २५ धावक ही मशाल घेऊन मालवणवरून सावंतवाडी येथे पोहोचतील.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एवढे धावक सलग मशाल घेऊन सुमारे ६५ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. मालवणमध्ये या धावकांसाठी कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत यांनी राहण्याची, किल्ल्यावरून मशाल घेऊन येणाची तसेच खाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी सावंतवाडी येथे पोहोचल्यावर धावकासाठी सत्कार आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.


वरील उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्सचे कौतुक होत आहे. युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकणसाद, सर्व पत्रकार बंधू आणि डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडीचे प्राचार्य), प्रसिद्ध कबड्डी प्रशिक्षक जावेद शेख, पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधूरनर टीमचे कौतुक होत आहे. 


सिधूरनर टीमने आतापर्यंत सावंतवाडी १२ तास रन, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मैरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मैरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेलरन, लोकमत मैरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रनमध्ये भाग घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.