विद्यार्थ्यांच्या 'विठ्ठला'वर शुभेच्छांचा वर्षाव !

मी पैसा नाही, विद्यार्थी कमविले : व्ही.बी.नाईक
Edited by: विनायक गांवस
Published on: December 05, 2022 15:37 PM
views 564  views

सावंतवाडी :  गुरुवर्य व्ही.बी.नाईक सर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.  शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून वाढदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक संस्थांसह शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमोर विद्यार्थी अन पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली संस्था आहे. जीवनात मी पैसा कमविला नाही. मात्र, विद्यार्थी कमविले असे भावोद्गार व्ही.बी.नाईक यांनी काढले. 


राणी पार्वती देवी हायस्कूल येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बुवा कृष्णा राऊळ व सर्वेश राऊळ यांच्या स्वागतपर अभंग गायनान करण्यात आली. यांनंतर व्ही. बी. नाईक सरांच ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आल. संस्थाध्यक्ष विकास सावंत व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व मानपत्र प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्राच वाचन डॉ. सुमेधा नाईक यांनी केल. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर, दोडामार्ग इंग्लिश स्कूल, चौकुळ इंग्लिश स्कूल, बी. एस. नाईक मेमोरिअल ट्रस्ट, डॉ. जे.बी. नाईक महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, वासुदेवाश्रम ज्ञानप्रबोधिनी संस्कार केंद्र, ब्लुमिंग बर्ड प्रायमरी स्कूल, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, शांतीनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, सावंतवाडी संस्थान मराठा समाज आदि संस्थाकडून सरांचा सत्कार करण्यात आला.यानंतर माजी विद्यार्थी दयानंद गवस, बाळ पुराणिक आदिसह उपस्थित मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केल. याप्रसंगी माजी विद्यार्थी, निवृत्त पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस म्हणाले, आम्हाला घडविण्यात व्ही.बी. नाईक सरांचं योगदान मोठ आहे. त्यांच्यामुळे आमची ओळख जगाशी होऊ शकली. सरांच्या शिकविण्यामुळे इंग्रजी विषयाची भीती डोक्यातून गेली. त्यांनी आमच्यात ठासून भरविलेल्या आत्मविश्वासामुळे स्पर्धापरीक्षांत यशस्वी होऊ शकलो. आमच्या विद्यार्थ्यांच्या या विठ्ठलाला साष्टांग दंडवत.   


पत्राद्वारे आलेल्या शुभेच्छांच वाचन प्रा. मिलिंद कासार यांनी केल. शुभेच्छा मनोगत व्यक्त करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत म्हणाले, व्ही.बी. नाईक सरांकडून त्यांच्यातील चांगले गुण घेण्याचा मी प्रयत्न केला. सरांचा आणि माझा सहवास अनेक वर्षांचा आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्ठी शिकता आल्या. शिक्षक, प्रचार्य व आता संस्था सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. सावंतवाडील सरकारी रुग्णालयाला डॉ. गुप्तांच रूग्णालय म्हणून ओळखलं जातं तसंच आरपीडीला व्ही.बी.नाईकांची शाळा म्हणून ओळखलं जात. अनेक माजी विद्यार्थी जेव्हा शाळेला भेट देतात तेव्हा आवर्जून सरांच नाव घेतात. शिक्षक म्हंटल की आजही विद्यार्थ्यांना सर आठवतात. या विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांच मोठ योगदान आहे. आदर्शवत कार्य व्ही.बी. नाईक यांनी केल असून ते रिटायर्ड झाले असले तरी टायर्ड नाहीत, थकलेले नाहीत. त्यांच कार्य आजही त्याच पद्धतीने सुरु आहे. त्यांच्या निरोगी दिर्घायुष्याकरीता संस्थेच्यावतीने शुभेच्छा.


दरम्यान, सत्काराला उत्तर देताना गुरुवर्य व्ही.बी.नाईक सर म्हणाले, समोर विद्यार्थी आहेत. तर पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली संस्था आहे. हा सोहळा एवढा भव्य होईल असा स्वप्नात देखील नव्हत. परंतु, डॉ. दिनेश नागवेकर सरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गेल्या चार दिवसांपासून विद्यार्थी फोन करत आहेत, घरी येऊन शुभेच्छा देत आहेत. भेटवस्तूंनी खोली देखील भरून गेलीय. या भेटवस्तूची अपेक्षा मला नाही. मी पैसा कमवाला नाही मात्र विद्यार्थी कमवलेत‌. विद्यार्थ्यांच म्हणणं आहे त्यांना मी घडवलं. परंतु, मी असं म्हणणार नाही, माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार हा स्वतः आहे. मी केवळ एक निमित्त मात्र ठरलो. माझे आई-वडील, शिक्षक यांच्यामुळे मी घडलो. माझे काही सहकारी शिक्षक आज या जगात नाहीत. त्यांच स्मरण आज होत आहे. माझे विद्यार्थी हे सागरासारखे स्वच्छ अन् निर्मळ आहेत. त्यांच प्रेम पाहून आज भावना अनावर झाल्या आहेत. तर शब्दही अपूरे पडत आहेत. ही शाळा हे माझ घर आहे. माझ्या वडिलांच निधन मी २० वर्षांचा असताना झालं. त्यानंतर बी.एस.नाईक सरांनी मला आधार दिला. म्हणून मी त्यांना आधारवड मानतो. माझे शिक्षक ना. भाईसाहेब सावंत हे याच संस्थेचे अध्यक्ष होते. आरोंद्यात एक वर्ष सेवा बजाविल्यानंतर आरपीडी सारख्या मोठ्या शाळेत ८ ते ११ वी च्या विद्यार्थांना शिकविण्याची संधी मला मिळाली. वडीलांचा आवडता विषय इंग्रजी होता‌. त्यांनी या विषयाची माझ्याकडून तयारी करून घेतली होती. याचा फायदा असा झाला की हा विषय मला आवडू लागला. या विषयात उच्च शिक्षण घेत एम. ए. पदवी घेतली त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिल नाही. आज प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक खात्यात माझे विद्यार्थी कार्यरत आहेत हे सांगताना एक शिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो. ही मूल यशाच्या उंच शिखरावर आहेत‌ याचा आनंद होतो. आजच हे प्रेम पाहून भावनीक झालोय, त्यामुळे जास्त बोलता येणार नाही. तुमच्या ह्या प्रेमाबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो.


यानंतर ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शेकडो माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहत सरांना शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे संचालक आमोल सावंत, बी.एस.नाईक मेमो. ट्रस्टचे डॉ. सुर्वे, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, संदीप राणे, सोनाली सावंत, आर.वाय. पाटील, सतीश बागवे, मनोज नाईक, राजाराम गावडे, डॉ. सावंत, सुनील राऊळ, गिरीधर परांजपे, विजया परब व नाईक कुटुंबिय तसेच सर्व संस्था सदस्य, सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण बांदेकर, सूत्रसंचालन प्रा. शैलेश नाईक यांनी तर आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.