दोडामार्ग : पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनलेल्या तिलारी संवर्धन क्षेत्रांत तेरवन मेढे उन्नेयी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तिलारी नदीच्या किनारी प्रचंड मोठा भानामती तथा देवदेवस्की प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने बुधवारी रात्रौ ही देवदेवस्की केल्याचं बोललं जात आहे. या देव देवस्कित चक्क बकऱ्याचा बळी देत त्या कापलेल्या बकऱ्याचे धड तेथेच टाकून बकऱ्याच मुंडक मात्र गायब केलं आहे. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी 100 ते 150 पानांचे तीन संच आणि त्यावर सुपारी ठेवण्यात आली आहे. या घटनेने तिलारी खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
खरंतर ही देवदेवस्की ज्या ठिकाणी करण्यात आली ती तिलारी संवर्धन करून तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला नदीकिनारी करण्यात आली आहे. हा स्पॉट खरं तर गेल्या दोन-तीन वर्षात गोमंतकीय आणि बाहेरून येणाऱ्या सर्वच पर्यटकांसाठी निसर्ग पर्यटनासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा स्पॉट बनला आहे. रोज शेकडो पर्यटक या ठिकाणी नदीत डुंबण्याचा आणि वनभोजनाचा आनंद कुटुंबासह लुटत असतात. मात्र याच ठिकाणी हा अघोरी प्रकार करण्यात आल्याने तिलारी खोऱ्यातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे आज जोरदार समर्थन होत असताना आजच्या एकविसाव्या शतकातही अशा अघोरी प्रवृत्तींना समाज आणि शासन प्रतिबंध घालण्यात कुठेतरी अपयशी ठरल्याचं या प्रकाराने पुन्हा एकदा अधोरेखित झाल आहे. त्यामुळे ज्या महाभागाने हा प्रकार केला त्याचा शोध काढून त्याला अद्दल घडवणं सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
एका ठिकाणी तिलारी खोरे हा जैवविविधता आणि पर्यटनाचा हॉटस्पॉट बनत असताना समाजातील नकारात्मक प्रवृत्ती असे अघोरी प्रकार करत असतील तर ते सामाजिक स्वास्थ बिघडवत असून नैसर्गिक पर्यटनाला सुद्धा गालबोट लावत आहे. त्यामुळे या अघोरी कृत्याचा प्रशासन पोलीस यंत्रणेने छडा लावणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.