कॅनबेरा: जगात आजही अनेक रहस्यं आहेत, त्यांच्यामागचं गूढ अद्याप उकललेलं नाही. आभाळातून माशांचा पाऊस पडणं हे त्यापैकीच एक. ऑस्ट्रेलियाच्या लाजमानुमध्ये मंगळवारी अचानक माशांचा पाऊस पडला. आकाशातून मासे अक्षरश: धो धो कोसळू लागले. त्यामुळे जिथे पाहावं तिथे मासेच मासे दिसत होते. रस्त्यांनर माशांचा खच पडला होता. अनेक लहानग्यांनी मासे गोळा केले आणि ते काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवले.
लाजमानु ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात येतं. हा भाग तनामी वाळवंटाजवळ आहे. वादळानंतर झालेल्या पावसानंतर या ठिकाणी माशांचा पाऊस पडला. 'शहराला एका मोठ्या वादळाचा तडाखा बसला. वादळानंतर मोठा पाऊस पडेल, असं स्थानिकांना वाटत होतं. मात्र वादळानंतरचं दृश्य पाहून सगळेच चकित झाले. कारण थोड्या वेळात नुसता पाऊस सुरू झाला नाही, तर आभाळातून शेकडो मासे पडू लागले. ते बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला,' अशी माहिती सेंट्रल डेझर्ट काऊन्सिलर अँड्र्यू जॉन्सन यांनी दिली.
वादळानंतर पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात आकाशातून मासे पडू लागले. यातील कित्येक मासे जिवंत होते. काही लहान मुलांनी ते मासे काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवले. यामुळे लाजमानुमधील अनेकजण चकीत झाले. लाजमानुमध्ये गेल्या ३० वर्षांत किमान चारवेळा अशा प्रकारे माशांचा पाऊस पडला आहे. लाजमानुमध्ये माशांचा अखेरचा पाऊस मार्च २०१० मध्ये पडला होता.
२०१६ मध्ये क्विन्सलँडच्या विंटनच्या बाहेरील भागांमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. शक्तिशाली वादळं पाण्यासोबत मासेही स्वत:कडे खेचून घेतात. त्यानंतर हेच मासे पावसासोबत शेकडो किलोमीटर दूरवर कोसळतात, असं हवामानतज्ज्ञ सांगतात.