फुकेरीच्या शिवकालीन हनुमंत गडाला शिवप्रेमी देणार नवी झळाळी

गडावर प्रतिष्ठापना होणार महाराजांच्या मूर्तीची !
Edited by: संदीप देसाई
Published on: December 17, 2022 11:16 AM
views 267  views

दोडामार्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहास व पराक्रमाची साक्ष देणाऱ्या फुकेरी येथील हनुमंत गडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. त्या निमित्ताने या गडाचा इतिहास तसेच संपूर्ण माहिती प्रकाश झोतात येण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे उपक्रम राबविण्यामध्ये तमाम शिवप्रेमी तसेच येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचा व फुकेरी ग्रामस्थांचा मोठा सहभाग असून २१ डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. फुकेरीच्या हनुमंत गडावर २५ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन होणार असल्याची माहिती शिवप्रेमींनी  दिली. 

       दोडामार्ग राष्ट्रोळी मंदिरात शुक्रवारी सायंकाळी शिवप्रेमींनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होत. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस, भारत माता की जय संघटना गोवा व दोडामार्ग तालुका आयाम प्रमुख गणेश गावडे, उत्तर व राष्ट्रीय बजरंग दल उपाध्यक्ष रवींद्र आईर, राष्ट्रीय मातृशक्ती प्रमुख शुभांगी गावडे, मोहिनी रेडकर, उदय पास्ते, वैभव इनामदार, रघुनाथ आईर, विलास आईर, योगेश आईर, नरेश आईर, रामदास आईर, सचिन आईर, अमोल आईर, रोहिदास आईर, साहिल आईर, किरण आईर, दिवाकर गवस आदी शिवप्रेमी उपस्थित होते. 

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने राज्य तसेच देशभर गड-किल्ल्यांचे संवर्धन जोपासना करण्याचे काम सुरू आहे. या प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागाकडून दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी या गावातील हनुमंत गडाचे देखील संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.  गडाचा इतिहास आणि गडाशी निगडित अनेक जुने घटनाक्रम, गडावरील छोटीमोठी स्थळे आदी गोष्टी प्रकाशझोतात आणण्यात येणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी या गडाची माहिती उपलब्ध होईल. 

महाराजांची दगडी मूर्ती गडावर बसविणार

हनुमंत गडावरील महादरवाजा बऱ्याच वर्षांपूर्वी गाडला गेला होता. तो अलीकडेच शिवप्रेमीनी साफसफाई करून मोकळा केला.  गडापर्यंत जाणारी पायवाट देखील व्यवस्थित करण्यात आली आहे. तसेच गडावर येऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. गड परिसरातील तीन तोफा ज्याजवळपास प्रत्येकी दीड टनाच्या आसपास आहेत.  या तिन्ही तोफा काट्याकुट्यातून वाट काढत शोधण्यात आल्या असून खास सागवानी पद्धतीचे तोफगाडे गडावर उभारून त्यावर त्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची दीड टन वजनाची दगडीमूर्ती गडावर लवकरच बसविली जाणार आहे. या कामासाठी आम्हाला दोडामार्ग तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचे बहुमोल सहकार्य मिळावे अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली.


२१ ते २५ डिसेंबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम उपक्रम

       या फुकेरी गडसंवर्धन कार्यक्रमांतर्गत २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी शिवप्रेमी कडून स्वागत केले जाणार असून यात्रेत शिवाजी महाराज व हनुमंत गड या दोघांची प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. तसेच 'मी गड बोलतोय' अशी आत्मवृत्तपर खास ऑडिओ क्लिप या यात्रेत ठेवण्यात येणार आहे. २४ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व जागर गोंधळ, २५ डिसेंबर रोजी तिन्ही तोफांचे लोकार्पण व महाराजांच्या प्रतिकृतीचे पूजन व प्रतिष्ठापना संपन्न होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात हजारो शिवप्रेमींच्या सहित माता भगिनींनी आवर्जून सहभाग दर्शविला आहे, असेही शिवप्रेमींनी सांगितले. 

२१ डिसेंबरला सकाळी ९ वा. दोडामार्ग शहर (रथ यात्रा प्रारंभ), दुपारी १२ वा. साटेली-भेडशी, सायंकाळी ४ वा. तळेखोल, २२ डिसेंबर सकाळी १० वा. बांदा, सायंकाळी ४ वा. सावंतवाडी, २३ डिसेंबर सकाळी १० वा. कुडाळ, मालवण, सायंकाळी ४ वा. कणकवली अशी रथयात्रा होणार आहे.