...एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो !

Edited by:
Published on: September 11, 2025 10:43 AM
views 45  views

कृष्णा ढोलम


सिंधुदुर्ग या देशातल्या पहिल्या पर्यटन जिल्हयाला अनेक पैलुंनी वेगळे महत्व आहे. इकडची लोककला, संस्कृती, परंपरा, अलौकीक निसर्गसौंदर्य आणि   फणसासारखी गोड माणसे, याचे आकर्षण सर्वांनाच असते. साहित्यातुन किंवा सध्या सोशल मीडीयाच्या माध्यमातुन हाच सिंधुदुर्ग सर्वांच्या नजरेत आहे. प्रत्यक्ष सिंधुदुर्गातील चित्र मात्र अत्यंत वेगळे आहे. खराब रस्ते किंवा अन्य मुलभुत सुविधांचा अभाव तर राज्याच्या कानाकोप-यात दिसतोच आहे. परंतु गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या कोकणला अवैध धंद्यांनी  पोखरले आहे. हाताला काम नसले तर पोटाला काहीतरी रोज द्यावेच लागते. त्यामुळे इथले तरूण अशा अवैध धंद्यांकडे वळताना दिसतात. अर्थात यात त्यांचा दोष किती आणि सिस्टीमचा दोष किती, हा प्रश्न वेगळा आहे, परंतु सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात घेतलेली कठोर भुमिका हि तितकीच महत्वाची आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हयाला अनेक दिग्गज पालकमंत्री लाभले. अलिकडच्या काळात पाहिले तर खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले तर आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला. चांदा ते बांदा योजनेतून मासेमारी, पर्यटन, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पक्क्या रस्त्यांचे मजबुत जाळे तयार करण्यावर भर दिला. परंतु या सर्व कामांसोबतच सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलत आपल्या कार्यपध्दतीचे एक वेगळेपण दाखवुन दिले आहे. या कारवाईत स्वतः सहभागी होत त्यांनी अवैध धंदे करणा-या व्यावसायिकांसोबतच पोलिस प्रशासनालाही इशारा दिला आहे. 

पालकमंत्री नितेश राणे हे भाजपच्या आक्रमक नेतृत्वांच्या पहिल्या फळीतले युवा नेते. त्यांच्या कामाची स्टाईल राज्याच्या कानाकोप-यातील जनतेला माहित आहे. त्यामुळेच तर कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली.  आता मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांच्याकडुन अशाच काहीशा धडाकेबाज कामाची अपेक्षा जनतेला होती. निवडणुकीदरम्यानच्या आपल्या जाहिरनाम्यात सहसा उल्लेख नसणा-या अशा काही उपक्रमांवर  जोरदार काम करणारे हे एकमेव पालकमंत्री असावेत. प्रसिद्धीसाठी  असे काम करणारे हे नेतृत्व नक्कीच नाही. कारण, ते केवळ एक कारवाई करून थांबले नाहीत तर त्यात सातत्य आहे. त्यासोबतच त्यांच्या या कारवाईचा एवढा धसका पोलिस प्रशासन आणि अवैध धंदेवाल्यांनी घेतला आहे, की जणु मुघलांच्या सैन्याला जसे छत्रपती शिवरायांचे मावळे धनाजी आणि संताजी पाण्यातही दिसायचे, तसे पालकमंत्री दिसतात. 

एका वेगळया दृष्टीकोनातुन पाहिले तर या कारवाईची गेल्या कित्येक वर्षांपासुन गरज होती. जनतेच्या मनात प्रत्येक राजकारण्यांबाबत एक संभ्रम असतो की पोलिस, दोन नंबरवाले यांच्याशी राजकारण्यांचे साटेलोटे असते. हा गैरसमज पालकमंत्री राणे यांच्या या कारवाईने दुर तर केलाच परंतु गावातील वडिलधारी मंडळींचे आशिर्वादही लाभले. आपल्या घरातला मुलगा आपले ऐकत नाही, कामधंदा करत नाही, रोज अवैध धंद्यामध्ये आपला दिवस घालवतो, ही बाब त्यांना वेदना देणारी होती. यावर कोणीच काही करू शकत नाही, असा समज करून हे वयोवृध्द देवाक काळजी असे म्हणत सर्व काही त्या देवावर सोडुन देत. परंतु गेल्या कित्येक वर्षात झाली नाही अशी कारवाई पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरू केल्याने आता किमान असे काहीतरी होवु शकते, हा विश्वास जनतेत निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेत. 

अर्थात, एखाद्या दुस-या कारवाईने अवैध धंद्याची हि किड जाणार नाही, हेही तितकेच खरे आहे. परंतु म्हणतात ना, कौन कहता है आसमान मे सुराख नही हो सकता...एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...याच पध्दतीने आता पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरूवात केली आहे. यात पोलिस प्रशासनासह जागरूक नागरीकांनीही सहभागी होवुन लोकआंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. महिलांनी एकजुट करून असे अड्डे उध्वस्थ करण्याची गरज आहे. जुगार, मटका झाला. अजुन अवैध दारू अडडे, वेश्या व्यवसाय, अवैध वाळु व्यवसाय यावरही कारवाई होण्याची आवश्यकता आहे. पालकमंत्री नितेश राणे यांची ही मोहिम निश्चितपणे जोर धरेल आणि सिंधुदुर्ग जिल्हयाला अवैध धंद्यापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यात पालकमंत्री यशस्वी ठरलेत, हे मात्र निश्चित.