मुंबई : 'जगण्याचे आर्त' ह्या विजय अर्जुन सावंत यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन परळच्या दामोदर हॉलमध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, संभाजी भगत, भाई मयेकर आणि निरजा हेदेखील उपस्थित होते.
दि सोशल सर्व्हिस लीग, मुंबईच्या शतक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी नारायण सुर्वे यांना आदरांजली देण्यासाठी कवितांच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हा प्रकाशन सोहळा पार पडला. सिंधुदुर्गातील कवी विजय सावंत यांचा 'जगण्याचे आर्त' हा नवीन कवितासंग्रह प्रभा प्रकाशन, कणकवली यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि प्रवीण बांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रस्तावना प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी लिहिली आहे.
या कवितासंग्रहाचे लक्षवेधक मुखपृष्ठ संदेश भंडारे यांनी तयार केले आहे. या कवितासंग्रहातील कवितांमधून विजय सावंत यांनी आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून भाष्य केले आहे. त्यामुळे कवितेच्या अधिक प्रगल्भतेच्या दिशेने होणारा प्रवास आपल्याला अनुभवता येऊ शकतो. कवी विजय सावंत हे कुंब्रल - दोडामार्गचे सुपूत्र असून समाजसेवा हायस्कूल, कोलझर, आरपीडी महाविद्यालय व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. ते सध्या दि सोशल सर्व्हिस लीग, मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कवी विजय सावंत यांचा २०१३ साली 'प्रकाश किरणांच्या शोधात' हा कवितासंग्रह 'कोमसाप'च्या दादर शाखेतर्फे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यशवंत देव, डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'सिंधुदुर्गातील आजची कविता' या प्रातिनिधिक कवितासंग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश होता.