POLITICS | नारायण राणे ‘लोकसभा’ लढवणार ?

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तयारी करण्याची भाजपची राणेंना सूचना मिळाल्याची चर्चा
Edited by: भरत केसरकर
Published on: January 16, 2023 13:40 PM
views 594  views

मुंबई : राज्यसभेचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तयारी करण्याची सूचना त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासमोर एक तगडे आव्हान उभे राहणार आहे.


शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. या सूत्राप्रमाणे शिंदे गटाकडून या जागेवर उमेदवार देण्याची तयारी सुरू होती. सुरुवातीला मंत्री दीपक केसरकर आणि नंतर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले. किंबहुना सामंत यांनी लोकसभेच्यादृष्टीने तयारीही सुरू केली.या दृष्टिकोनातून त्यांनी चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे त्यांनाच तिकीट मिळणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र भाजपाने एक अंतर्गत सर्वेक्षण केले. यात उद्धव ठाकरे सेना गट आणि शिंदे सेना या गटात अटीतटीची लढत होऊन काहीशे मतांच्या फरकाने ही बाजी पलटू शकते. विनायक राऊत पुन्हा तिसऱ्यांदा बाजी मारू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. त्यासाठी सुरुवातीला माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाचा विचार झाला होता. किंबहुना नारायण राणे यांचाही निलेश यांच्यासाठी जोर होता. यासाठी नारायण राणेही आग्रही होते, अस चर्चेत आहे.


परंतु, मिशन ४५ चे टार्गेट विनाव्यत्यय पूर्ण करण्यासाठी स्वतः नारायण राणे यांनी मैदानात उतरावे, अशी सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून करण्यात आल्याचे समजते. या दृष्टीने ते तयारीला लागले असल्याची माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत घेतलेल्या भेटीमागचे कोडे आता उलगडले आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी १३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात गुप्त बैठक झाली. या भेटीमागचे कोडे आता हळुहळू उलगडू आगले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात राणे आणि शिंदेंमध्ये चर्चा झाल्याचे कळते. एकनाथ शिंदे यांनी पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करण्याचे मान्य केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा जंगी सामना रंगताना दिसण्याची शक्यता आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात नेमकी काय स्थिती?


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघां\पैकी दोन विधानसभा मतदारसंघ सध्या भाजप- शिंदे गटाकडे तर एक मतदारसंघ उद्धव ठाकरे सेनेकडे आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर असून हा शिंदे गटाकडू मतदारसंघ संघ आहे.तर कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे असून हा भाजपकडे आहे.तर कुडाळ- मालवण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून आमदार वैभव नाईक यांनी दोन वेळा हा गड राखला आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात काय स्थिती?

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे.या ठिकाणी विद्यमान आमदार उदय सामंत यांचे प्राबल्य आहे. राजापूर मतदारसंघ उद्धव ठाकरेंकडे असून राजन साळवी यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. दापोली मतदारसंघ हा शिंदे गटाकडे असून या मतदारसंघावर आमदार योगेश कदम यांनी आपले वर्चस्व ठेवले आहे. चिपळूण मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असून येथे शेखर निकम यांनी हा मतदार संघ आपल्याकडे ठेवून वर्चस्व सिद्ध केले आहे.तर गुहागर हा मतदार संघ उद्धव ठाकरे सेनेकडे असून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे वर्चस्व या मतदारसंघांमध्ये आहे. पाच पैकी शिंदे  गटाकडे दीन,उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे दोन,राष्ट्रवादी कडे एक मतदार संघ आहे.


सिंधुदुर्ग-रत्नागिरी 50-50 ताकद


सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी शिंदे गटाकडे ३, भाजपकडे एक, उद्धव ठाकरे शिवसेनेजवळ तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे एक असे मतदारसंघ आहेत.शिंदे गटा- भाजप युतीकडे चार तर उदधव ठाकरे शिवसेना आणी राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडे चार विधानसभा मतदारसंघ असून या स्थितीत दोन्ही गटाकडे 50-50 टक्के बलाबल पहायला मिळत आहे.महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे युतीची ताकद फिफ्टी-फिफ्टी मानले जाते. 


नारायण राणेंनी सिंधुदुर्गात भाजप केलय मजबूत


2019 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेनी भाजपात प्रवेश केला. या दरम्यानच्या काळात नारायण राणे यांचे भाजपमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढली आहे. तर शिंदे गट भाजपसोबत आल्याने सावंतवाडी विधानसभा मतदान संघात भाजपची ताकद वाढलेली पाहायला मिळणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी आणि दापोली विधानसभा मतदार संघामध्ये शिंदे गट भाजपसोबत असल्याने भाजप-शिंदे गटाची युतीची ताकद वाढली आहे.. एकंदर मागच्या एक लाख 75 हजार विनायक राऊत यांच्या मताधिक्याचा विचार करता भाजप सद्यस्थितीत हे मताधिक्य तोडून बॅकलॉग भरून काढू शकतो. अशी वस्तूस्थिती आहे. नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास राणेंचे निष्ठावंत कार्यकर्ते, भाजप- शिंदे गटाचे कार्यकर्ते यांचा मोठा पाठिंबा मिळवून निश्चितच नारायण राणे या ठिकाणी बाजी मारतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींना असल्याने भाजपने या ठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केल्याचे समजते.


युवा नेते- उद्योजक विशाल परब सुद्धा इच्छुक?


या मतदारसंघ मधून नारायण राणे यांच्याबरोबर,निलेश राणे, प्रसाद लाड, प्रमोद जठार, सुरेश प्रभू, यांच्यासह युवा नेतृत्व असलेले विशाल परब यांचे नाव चर्चेत आहे.तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांचे नाव चर्चेत आहे


सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजप कडून भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक तथा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब हे सुद्धा इच्छुक आहेत. गेली एकषदोन वर्षे त्यांनी या संदर्भात काय सुद्धा सुरू केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश शाळात मोफत दप्तर वाटप करून डोअर टू डोअर जाण्याचा प्रयत्न केला आहे.तर जिल्ह्यात विविध सांस्कृतिक,शैक्षणिक,आध्यात्मिक,वारकरी,क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम व उपक्रम राबवत विशाल परब यांनी आपला जोरदार झंझावता निर्माण केला आहे.यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विशाल परब यांचे पण नाव भाजपकडून पुढे आले आहे.शांत,संयमी,मनमिळाऊ,प्रेमळ स्वभाव असलेल्या विशाल परब यांची लोकप्रियता सध्या वाढत असून तरूण वर्गातून त्यांना मोठी पसंती मिळताना पहायला मिळत आहे.भाजप विशाल परब यांच्या रूपाने तरूण व नविन चेहरा देणार का? याकडे सुद्धा लक्ष्य लागून आहे.