श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही.
कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव 'हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या या सर्व देवस्वाऱ्या या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात.
कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात.
कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे. या गुहेत शिवलिंग, नंदी, तसेच स्त्री-पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे आहेत.
दक्षिण कोकणची काशी, अशी ओळख असणाऱ्या या मंदिरात महाशिरात्रीला भक्तांचा सागर लोटला जातो. श्री कुणकेश्वर क्षेत्र म्हणजे कोकणच्या धार्मिक पर्यटनाचा मानबिंदूच आहे.