
सिंधुदुर्ग : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद घेऊन मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या आता नवीन बसेस येत असल्या तरी सध्या चालू स्थितीत असलेल्या असंख्य बसेसच्या अनेक समस्या आहेत. परंतु हे महामंडळ आर्थिक तोट्यात असल्यामुळे आहेत त्या बसेस, आहेत त्या स्थितीत दामटविणे चालक-वाहकांना क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, व्यवस्थापनाचा या एसटी गाड्यांकडे लक्ष नसल्याने या बसेसच्या अनेक समस्या प्रवाशांना उद्भवत आहेत.
कोकणातील जवळजवळ सर्वच एसटी आगारे अशा असंख्य समस्यांनी व्यापलेली आहेत. आता पावसाळा असल्याने एसटीमध्ये पाण्याची गळती, मध्येच गाडी बंद पडणे, स्टिअरिंग लॉक होणे, ब्रेक फेल होणे, प्रवाशांनाच एसटी चालू करण्यासाठी ढकलावी लागणे अशा अनेक समस्या असतातच.
सावंतवाडी एसटी आगारातील एसटी बसेस अशाच अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहेत. याच आगाराची ‘एमएच २० बीएल १८५१’ या क्रमांकाची एक एसटी बस असून यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी आरक्षित (रिझर्व्ह) असलेली सीट (नं. १३, १४) गायब आहे. (याचा अर्थ येथे स्वातंत्र्यसैनिकच नाहीत का? की ते एसटीने प्रवास करीत नाहीत) तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एका सीटवर तर टायरचे रिझर्व्हेशन आहे. म्हणजेच त्या जागी चक्क टायर ठेवलेला आहे. एसटीचे चालक - वाहक आपापल्या परीने गाडी चालवितात. यात त्यांचा काहीच दोष नाही, परंतु सावंतवाडी एसटी आगाराचे व्यवस्थापन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. जाणकार प्रवाशांना ही गोष्ट लक्षात येऊन ते प्रसंगी तक्रारही करतात वा चालक-वाहकांशी वादही घालतात. सामान्य प्रवासी मात्र यावर बोलणे टाळतात. परंतु याचा काहीही उपयोग होत नाही.
एसटी महामंडळाच्या सर्वच बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी २ सीट, ज्येष्ठ नागरिकांसाठी २ सीट, दिव्यांगांसाठी ४ सीट, महिलांसाठी ४ सीट असे सर्वसाधारण आरक्षण असते. तसे त्या सीटवर नमूदही केलेले असते. जेणेकरून स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक अथवा महिला यांना त्या सीटचा लाभ व्हावा. परंतु येथे सीटच गायब असल्याने या लोकांनी तक्रार कुठे करायची ? तक्रार केल्यावर थातूर-मातूर उत्तरे देण्यात हे व्यवस्थापन पटाईत आहे. मात्र, कित्येक वर्षे त्यावर उपाययोजना ही होतच नाही.
एसटी महामंडळाने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ सुरू केलेल्या या बसेसमध्ये आणखी किती समस्या आहेत, असतील. प्रवाशांनी तक्रार न करता मूग गिळून गप्प बसावे का ? स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला यांनी आपल्या हक्कासाठी असलेल्या या सीटचा वापर करू नये का ? असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात रुंजी घालत आहेत.
व्यवस्थापनाने याकडे लक्ष द्यावे
आगारात असलेल्या एसटींच्या समस्या सोडविण्याकडे आगार व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक एसटी बस कशी सक्षम असेल, याची काळजी घेण्याची गरज आहे. आपण प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणतो, प्रवाशांनी अगदी बिनदिक्कत आपल्या या एसटी बसमध्ये बसावे, यासाठी त्या त्या आगार व्यवस्थापनाने याचे अवलोकन करून तशा एसटी बस सुस्थितीत ठेवाव्यात एवढीच अपेक्षा प्रवाशांकडून असते.