दोडामार्ग :दोडामार्ग शहरातील मुख्य बाजारपेठेत नो पार्किंग झोनचा मुद्दा मंगळवारी झालेल्या नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. बाजारपेठेत कोणत्या ठिकाणी पार्किंग झोन उभारावेत यावरून सभेत एकच खडाजंगी उडाली. मात्र नगराध्यक्ष सत्ताधारी गटाने काहींचा शहरात मुख्य बाजारपेठेत पार्किंगझोन साठी असलेला विरोध मोडीत काढत अखेर अजेंठ्या वर ठेवलेल्या विषयानुसार पार्किंग झोन उभारण्यासंदर्भात एकमत घडवून आणण्यात यश मिळविले. त्यामूळे आता दोडामार्ग शहरात गोवा रोडवर पिंपळेश्वर चौक ते आनंद कामत घर पूर्ण नो पार्किंग आणि सावंतवाडी रोडवर सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा पर्यंत चारचाकी वाहनासाठी नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसई - दोडामार्ग नगरपंचायतची मासिक सर्वसाधारण सभा नगरपंचायतीच्या हनुमंत सभागृहात आयोजित पार पडली. यावेळी सभेला प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण सभापती गौरी पार्सेकर, महिला बालकल्याण ज्योती जाधव नगरसेविका सौ. क्रांती जाधव, सौ. सुकन्या पनवेलकर, सौ संध्या प्रसादी,सौ. स्वराली गवस, सौ. संजना म्हावळणकर, रामचंद्र मणेरीकर, श्रीमती वासंती मयेकर,राजेश प्रसादी, रामचंद्र ठाकुर, रामराव गावकर, संतोष नानचे, पांडुरंग बोर्डेकर, संजय खडपकर यांसह अधिकारी उपस्थित होता. विविध विषयांवर चर्चा सुरू असताना सभेत बाजारपेठत वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीचा व पार्किंग - नो पार्किंग झोन उभारण्याचा विषय चर्चेला आला असता नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पिंपळेश्वर चौक ते गोवा रोडवरील आनंद कामत यांच्या निवासस्थानापर्यन्त नो पार्किंग झोन तसेच पिंपळेश्वर चौक ते जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँक शाखा इथेपर्यंत केवळ चारचाकी साठी नो पार्किंग झोन उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा नगरसेवक नानचे यांनी अगोदर वाहनांसाठी पार्किंगच्या सुविधा करा, व्यापाऱ्यांना त्रास व नुकसान होणार नाही याची काळजी घ्या असे मत मांडले. त्यावर नगराध्यक्ष चव्हाण यांनी पार्किंग झोन का गरजेचे आहेत, बेशिस्त पार्किंग मुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते, आपात्कालीन परिस्थितीत तर बाजारपेठ मधील बेशिस्त पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होते अशी बाजू मांडली. त्यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी सविस्तर चर्चा केली. चर्चे अंती अखेर गोवा रोडवरील जुन्या पोलीस चौकीलगत असलेल्या मोकळ्या जागेत तसेच आयी रोडवरील मराठी प्रशालेच्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगची सुविधा उभारावी व ठरलेलं नो पार्किंग झोन जाहीर करावेत यावर सर्वांचे एकमत होत, विषयानुसार नो पार्किंग झोन ठराव मंजूर करण्यात आला.
तर नो पार्किंग विषया प्रमाणेच शहरातील सा.बा. च्या ताब्यातील रस्ते नगरपंचायत ताब्यात घेण्यावरून सुद्धा सभागृहात किरकोळ शाब्दिक चकमक उडाली
शहरातील सर्व प्रमुख रस्ते नगरपंचयातच्या ताब्यात येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात अशी भूमिका मांडताना नगराध्यक्ष चव्हाण यांनी रस्ते न. पं. कडे आल्यावर रस्त्यांची रुंदी किती असावी, याबाबतच निर्णय आपण घेऊ शकतो त्यामुळे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत मांडले. मात्र त्यालाही नानचे यांनी विरोध केला. भविष्यात शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता रस्ते मोठे व प्रशस्त असलेले फायदेशीर ठरतील. शिवाय न. पं. कडे रस्ते वर्ग करून घेतल्यास त्यांची देखभाल - दुरुस्ती करण्यासाठी नगरपंचायत कडे पुरेसा निधी आहे का? असे सवाल करत ते रस्ते बांधकाम विभागाकडे ठेवावेत अशी बाजू नगरसेवक नानचे यांनी मांडली. मात्र नगराध्यक्ष चव्हाण यांनी नानचे यांना आता तुम्हाला व्यापाऱ्यांचे नुकसान दिसत नाही का ? असे सुनावताना मी जे पार्किंग नो पार्किंग संदर्भात बोलत होतो तेव्हा आपण व्यापाऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करता मग आता तुम्हाला व्यापाऱ्यांचे हित दिसत नाही काय ? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित करत नानचे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सभेमध्ये केला. त्यांनतर शहरातील सर्व मालमत्तांच्या मूल्यांमध्ये सुधारणा करणे, सर्व्हे क्र. 197 / 4 अ या जागेत क्रीडा संकुल उभारणे, नगरपंचायत स्थापना दिन साजरा करणे, तसेच नाट्यगृह उभारणी, पर्यटन विकास निधी अंतर्गत दोडामार्ग महोत्सव आयोजित करणे आदीं विषयांवर चर्चा करण्यात आली.
तर याच सभेत दोडामार्ग शहरातील विकासासाठी आजवर निधी दिलेल्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार विनायक राऊत या तिघांच्याही अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. त्याला सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठींबा दिला. तसेच यापुढेही न. पं. ला विकासनिधी देणाऱ्या प्रत्येकाचे विशेष अभिनंदन ठराव मांडले जातील असेही स्पष्ट केले आहे.