मुंबई आणि परिसरातील जिल्ह्यांत कोकणातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ती किती प्रमाणात आहे याचा विशेष अनुभव गणेशोत्सवावेळी रेल्वे प्रशासन, खासगी - राज्य महामंडळाच्या बस गाड्या यांची सेवा देणाऱ्यांना आहे. असे असूनही गेली अंदाजे १२ वर्षे मुंबई - गोवा महामार्गाचे घोंगडे भिजत आहे. त्याला काही अद्याप पूर्णपणे समृद्धी आलेली नाही. मुंबई - नागपूर या ७०१ किमी पैकी ५२० किमीच्या नागपूर - शिर्डी या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान महोदयांनी उदघाटन केले. देशातील मोठा महामार्ग म्हणून ७०१ किमीच्या या महामार्गाकडे पाहिले जात आहे. मात्र मुंबई - गोवा महामार्ग का रखडला आहे ? हा प्रश्न कोकणवासीयांना सतावत आहे. पावसाळ्यात या महामार्गावर प्राणघातकी खड्डे असतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी होते. परिणामी मानसिक त्रास होतो, इंधन - वेळ वाया जातो आणि बहुतांश वेळ प्रवासातच खर्च होतो. शिवाय प्रदूषणात भर पडते ती तर दुर्लक्षितच असते. असे काय घोडे मारले आहे आम्ही की आम्हाला एक चांगला महामार्ग मिळू शकलेला नाही ? या कोकणवासीयांच्या रोकड्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच आहे. कोकणात मुसळधार पाऊस होतो. असे असले तरी रस्तेही त्याच दर्जाचे असावेत. या विचारात चूक काहीच नाही.
निसर्ग समृद्ध असे कोकण महाराष्ट्राचे नैसर्गिक सामर्थ्य, वैभव आहे. कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ जिल्हे म्हणून प्रथम मान मिळवलेले जिल्हे आहेत. असे कोकण कसे दिसते ? तेथील राहणीमान, दैनंदिन जीवनमान, आपुलकी, आहार, वातावरण कसे असते आदींचा वेध घेण्यासाठी कोकणात यावेसे वाटणाऱ्या बिगर कोकणवासी लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपले वाहन असेल तर कुठेही, कधीही चटकन जाता येते. हा तर पर्यटनाचा मूलभूत भाग आहे. यामुळे अधिकाधिक भाग पहाता येतो. असे असताना या मार्गाला जेवढा विलंब होत आहे. तितके आपण पर्यटनाच्या पटलावर मागे राहत आहोत. तितकाच महसूलही बुडत आहे. परिणामी बेकारी, बेरोजगारी यांना वाव मिळत आहे असे मानायचे का ? निसर्गाने कोकणाला पुष्कळ दिले आहे, देत आहे. पण ते कसे घ्यायचे याचे मानवी नियोजन चोख नसल्याने आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. बांधकामाला जेवढा विलंब होणार तेवढा त्याचा खर्च वाढणार. हे साधे व्यावसायिक गणित आहे. हे गणित मुंबई - गोवा महामार्गासाठी चुकले आहे. आजही या महामार्गाच्या अपूर्ण असलेल्या कामाची जाहीर चर्चा होणे यातच सर्व आले. देशातील अनेक जण पर्यटनासाठी केरळ राज्यात जातात. ठीक आहे. पण कोकणही पर्यटनात कमी नाही. हे लोकांना केव्हा कळेल जेव्हा ते कोकणात येतील तेव्हा आणि याची देही याची डोळा ती अनुभूती घेतील. यासाठी येथील रस्ते मार्गांचे जाळे भक्कम हवे.
हा महामार्ग पूर्ण झाला असता तर एव्हाना अन्य महामार्गही कोकणातून अन्य जिल्ह्यांत गेले असते. किंबहुना तसे नियोजन करता आले असते. जे सध्या या महामार्गाचे काम चालू आहे ते गुणवत्तापूर्ण असावे अशी माफक अपेक्षा आहे. डिझेल इंजिनवर धावणारी कोकण रेल्वे आता विद्युत इंजिनवर सुसाट पळत आहे. त्यामुळे इंधनाची पुष्कळ बचत होत आहे. पण कोकणात जाण्यासाठी महामार्ग अपूर्ण स्थितीत असल्याने चारचाकी वाहने सुसाट नेता येत नाहीत. गणेशोत्सव कालावधीत कित्येक जण पुणे - कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोचतात. पुष्कळ फिरून जावे लागते. सार्वजनिक विकासाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांमुळे कोकणवासी नाहक भरडले जात आहेत. यासाठी जनतेने किती शिव्या - शाप द्यावे तेवढे अल्पच आहेत. देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तरीही आम्ही अजून समृद्ध अशा महामार्गाच्या प्रतीक्षेत वर्षे पुढे ढकलत आहोत. केवळ एकाच आशेवर. आज ना उद्या होईल हा महामार्ग. भांडण - वाद - हिंसक कृती या सामान्य कोकणी माणसाच्या रक्तात नाहित. त्यामुळे तो कायम शांत असतो. याचे पाणी जोखले असे समजायचे का ? लवकरात लवकर मुंबई - गोवा महामार्गास समृद्धी यावी आणि देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर कोकण अधिक समृद्ध व्हावा, हीच एक कोकणवासी म्हणून इच्छा व्यक्त करतो. तसेच रस्ते खड्डे मुक्त होऊन प्रवास समृद्धमय होवो अशीही आशा व्यक्त करतो.
समृद्धी महामार्ग असो अथवा अन्य कोणतेही नवीन महामार्ग हे देशाच्या विकासाचे दर्शक आहेत. देशातील रस्ते मार्गांचे जाळे वेगाने पसरत आहे. हे वेगवान प्रगतीचे लक्षण आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष अभिनंदन ! कामाच्या संदर्भात कडक शिस्तीचा मंत्री देशाला मिळाला आहे. हे त्यांच्या रोखठोक भाषणांतून वेळोवेळी जाणवते. कंत्राटदारांवर, प्रशासनातील अधिकारी वर्गावर असाच अंकुश पाहिजे. पायाभूत सुविधांचा आत्मा म्हणजे रस्ते आहेत. देश अशीच प्रगती करत राहो. हे करताना पुढचे पाठ आणि मागचे सपाट असे होऊ नये. विचार करताना एक देश म्हणून विचार केला पाहिजे. साधारण वर्ष २०१५ मध्ये घोषित झालेल्या समृद्धी महामार्गाच्या एका टप्प्याचे उदघाटन झाले हे नक्कीच चांगले आहे. कारण अल्प कालावधीत महामार्ग झाला आहे. त्याचा दर्जा त्याच्या दैनंदिन उपयोगात समजणार आहे. याकडे लोकांचेही बारीक लक्ष असेलच. कोकणचा महामार्ग रखडला आणि विदर्भातील महामार्ग पुढे गेला म्हणून असुया वाटण्याचे काही कारण नाही. एक देश म्हणून व्यापक विचार झाला पाहिजे तर विविध राज्य, जिल्हे यांच्याशी नाळ घट्ट जोडता येईल. एक भारत म्हणून प्रखर राष्ट्र निष्ठेने उभे राहूया.
- जयेश राणे, मुंबई
(लेखक सामाजिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान, राजकीय, अर्थ, धार्मिक, कला आदी विविध विषयांचे विश्लेषक आहेत.)