दोडामार्ग शहरात केंद्रशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी लावला ब्रेक

आदी कामे पूर्ण करा, लोकप्रिनिधींनी स्थानिक प्रशासन यांना सोबत घ्या मगच लोकार्पण करण्याची दिली तंबी
Edited by: संदीप देसाई
Published on: February 24, 2023 23:14 PM
views 311  views

दोडामार्ग - 

दोडामार्ग शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नूतन इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही शुक्रवारी कोणालाही कल्पना न देता उदघाटन करण्याचा प्रशासनाने आखलेला बेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरसेवकांनी हाणून पाडला. जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा नगरपंचायत प्रशासन तसेच प्रसार माध्यमे या सर्वांनाच कोणतीही पूर्वकल्पना न देता अपूर्ण शाळा इमारतीचं थेट उद्घाटन करत शिक्षण विभाग मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष चव्हाण यांनी केला. काही झाले तरी काम पूर्ण करा, लोकप्रतनिधीं आणि स्थानिक नगरपंचायत यांना विश्वासात घेऊनच या शाळा इमारतीचं उद्घाटन करा अशा शब्दांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाला ठणकावले आहे. नगराध्यक्ष यांच्या या आक्रमक पवित्र्याने अखेर सीईओ प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत नियोजित आखलेला उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द करावा लागला. 

       दोडामार्ग शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रं. १ ची जुनी मुख्य  इमारत निर्लेखीत करून आता त्याठिकाणी नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या  इमारतीसाठी  जि. प. च्या शिक्षण विभागाकडून 36 लाख 56 हजार 2  निधी खर्च करण्यात आला. मात्र अद्यापही या इमारतीतीत विद्युत कनेक्शनची जोडणी झालेली नाही. तसेच शौचालयाची व्यवस्था सुद्धा पूर्ण करण्यात आलेली नाही.  शाळेच्या नामफलक देखील लावण्यात आलेली नाही. ही कामे अपुरी असताना  प्रशासन त्या इमारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते उदघाटन करण्याच्या प्रशासन तयारीत होते. ही बाब नागरध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या कानावर जाताच त्यांनी शुक्रवारी उदघाटना दिवशी थेट उदघाटन ठिकाणीच धाव घेतली. व याबाबत गट शिक्षाधिकारी निसार नदाफ यांची कान उघडणी केली.

आता उन्हाळ्याचे दिवस असताना विजेची व्यवस्था नसताना शालेय विद्यार्थी त्या इमारतीत कसे काय बसतील ? शौचालय नसताना विद्यार्थ्यांची सोय कशी काय होईल? नगरपंचायत क्षेत्रात शाळा असूनही आपण नगरपंचायतला याबाबत कल्पना दिली का? असे प्रश्न  उपस्थित करत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर आदींनी गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी धारेवर धरले. यावेळी निसार नदाफ यांच्यासोबत केंद्रप्रमुख राजलक्ष्मी लोंढे, मुख्याध्यापक जयसिंग गावीत उपस्थित होते. मात्र ते नगराध्यक्ष यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देऊ शकलेले नाहीत.

यावर बोलताना श्री नदाफ म्हणाले की, इमारत बांधुन बरेच दिवस झाले  मात्र इमारत उद्घनाच्या प्रतीक्षेत होती. याच दरम्यान शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रशासकीय कामकाजासाठी दोडामार्ग दौरा होता. त्या अनुषंगाने या इमारतीचे उदघाटन करण्याचे आम्ही योजिले होते. मात्र आता हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलत असल्याचे त्यांनी सांगतले . अपूर्ण असलेली कामे पूर्ण करूनच पालकमंत्री, स्थानिक आमदार, जि. प. प्रशासन, नगरपंचायत प्रशासन यांच्या उपस्थितीत या इमारतीचे उदघाटन करण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी नगराध्यक्ष व त्यांचे टीमला दिले. आणि दोडामार्ग दौऱ्यावर आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर हे सुद्धा पंचायत समितीची बैठक आटोपून परस्परच जिल्हा ठिकाणी परत जायला गेले. आणि दोडामार्ग केंद्र शाळेचे उद्घाटन होता होता राहिले.