रविवारच्या सकाळची रम्य वेळ. मोती तलावाचा सुंदर असा काठ. या काठावरील नगरपालिकेच्या बाजूला विविधरंगी आंब्यांचा भरलेला सुंदर असा बाजार. त्या हरीने मांडलेल्या आंब्याच्या बाजूने जाताना दरवळणारा आंब्याचा मोहक सुगंध अक्षरशः वेड लावून जातो...असेच काहीसे चित्र असते हल्ली सकाळी सावंतवाडी नगरपालिकेच्या बाजूच्या रस्त्यावर...
फळांचा राजा आंबा आणि कोकणातील माणसांना याचे वेगळे वैशिष्ट्य सांगण्याची बिलकुल गरज नाही. रायवळ आंब्यापासून बिटक्याचा आंबा, मिरमीरा आंबा, मोगरीचा आंबा, अशी खास विशेषणे असलेला आंबा, हापूस, रत्ना,केसर, पायरी, गोवा मानकुर, तोतापुरी यासह अनेक प्रकारच्या आंब्याचा आस्वाद कोकणी माणसे घेत असतात. त्यामुळेच अंबावडी, आंबा सरबत, आंबा कुल्फी अशा बाय प्रोडक्ट्सला येथे तेवढीशी पसंती नसते जेवढी ती बाहेरील लोक देतात.
एप्रिल- मे मध्ये येथेच आंबा खायचा आणि वर्षभरासाठी 'अ' जीवनसत्वासह भरपूर एनर्जी घ्यायची असाच काहीसा ट्रेन्ड येथे असतो. सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर हल्ली दररोज सकाळी आजूबाजूच्या गावातील शेतकरी आपल्या बागेतील आंबे विकायला घेऊन येतात. सकाळी सहा वाजल्यापासून हा बाजार भरायला सुरुवात होते. वेगवेगळ्या साईजचे, रंगाचे दर्जाचे हापूस, पायरी, केसरचे आंबे टोपल्यांमध्ये मांडले जातात.
सकाळपासूनच येथे सावंतवाडीतील नागरिक, रस्त्यावरून येणारे जाणारे पर्यटक यांची पावले हे आंबे बघून आपसूकच तेथे वळतात.आंब्याची पारख करून दरामध्ये थोडीशी घासाघीस करून मनपसंत आंबे खरेदी करून घराकडे घेऊन जातात.
या आंब्याच्या बाजारात आज सहजच फेरफटका मारला असता बहुतेक शेतकरी तुळस, वजराट, आडेली येथून आलेले होते असे समजले.आंब्याचा दरही हापुसचा साडेतीनशे ते चारशे रुपये पाचशे रुपये डझन, पायरीचा आंबा 300 ते 400 रुपये डझन, केसरचा आंबा चारशे रुपये डझन असा सर्वसाधारण आंब्याचा दर होता. बरेच ग्राहक दरासाठी घासाघीस करत होते. काही विक्रेते चवीसाठी आंबा कापून खायला देत होते.त्यामुळे इथे फिरताना एक वेगळीच मजा येत होती.
यावर्षी थंडी चांगली पडल्याने आंब्याला मोहर चांगला आला मात्र फेब्रुवारीतल्या वातावरणामुळे आंब्याच्या पिकाला जबरदस्त फटका बसला. मोहर जळून गेला. फलधारणा झालेली होती ती गळून पडून गेली. त्यातूनच जो राहिला तो आंबा खूपच कमी होता. त्यामुळे यावर्षी आंब्याचे दरही जरा चढेच राहिले आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या मध्यापासून दीडशे दोनशे रुपये डजनापर्यंत येणारा आंबा यावर्षी मात्र अजूनही 400 ते 450 रुपये डझनाच्या दरात घरात आहे. असं असलं तरी आंबे खाण्याचा मोह नक्कीच आवरत नाही. विशेषतः तुम्ही जर या मोती तलावा काठ च्या सकाळच्या आंब्याच्या बाजारात आलात तर त्या मोहक सुगंधाच्या आंब्यांची खरेदी तुम्ही नकळत कशी कराल हे तुम्हाला देखील समजणार नाही.