सावंतवाडी : मळगांव रेल्वेस्थानकालगतच्या एका हॉटेलमधून मुंबई-गोवा महामार्गावर नव्यानं उभारलेल्या एका हॉटेलमध्ये मालवाहू कंटेनरमधून जवळपास ३५ युवक-युवतींची वाहतूक अवैधरित्या होत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडी तालुक्यात घडला आहे. मळगाव येथे संशयास्पद वाटणारा कंटेनर थांबवल्यानंतर उपस्थितांनी कंटेनरशी संबंधित काहींना चोप देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील वातावरण चांगलंच तापलं असून कंटेनरची ही सफर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. एव्हेंटसाठी काम करणारी मुलं या कंटेनरमध्ये होती. असा प्रवास करण चुकीच आहे. परंतु, ही मुलं एव्हेंटसाठी जात होती. या प्रकरणी चालकाला दंड ठोठावला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिलीय. मात्र, दुसरीकडे, ज्या इव्हेंटसाठी हा कंटेनर जात होता ती व्यक्ती शांतता समितीची सदस्य व शहरातील एका व्यवसायिकाशी संबंधित असल्यानं संशय कल्लोळ निर्माण होऊन हा कंटेनर वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
या कंटेनरमधून जवळपास १५ मुली व २० मुलगे अशा ३५ जणांना घेऊन गेलं जात होतं. मळगाव बाजारात दुसऱ्या गाडीशी किरकोळ अपघात झाल्याने हा कंटेनर थांबला होता. यावेळी कंटेनरमधील ३५ जण आतमध्ये घुसमटल्यानं त्यांनी आरडाओरडा करत कंटेनरचा दरवाजा बडवायला सुरूवात केली. ग्रामस्थांना संशय आल्यानं हा कंटेनर त्यांनी अडवत त्या टीमला बाहेर काढलं.
एका विवाह सोहळ्यात कॅंटरींगच्या कामासाठी मुंबईची ही टीम दोन दिवसांपूर्वी तालुक्यात आली होती. मळगाव रेल्वे स्टेशनच्या नजीक ही टीम वास्तव्यास होती. कॅटरींगच सामान घेऊन आलेल्या कॅंटरमधून मळगाव मार्गे मुंबई- गोवा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये असणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी हा कंटेनर जात होता. प्रवासाचे पैसे वाचवण्यासाठी गुरांप्रमाणे कंटेनरमधून या ३५ जणांना नेण्यात येत होतं. मात्र, मळगाव बाजारात झालेल्या घटनेनंतर कंटेनरमधील आरडाओरडा ऐकून संशयास्पद वाटणारा हा कंटेनर ग्रामस्थांनी रोखला. याची माहिती मिळताच कंटेनरशी संबंधित काहीजण घटनास्थळी पोहचले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थितांनी त्यांना चोप देखील दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, युवक-युवतींची अमानवी वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध पोलीसांकडून दंड ठोठावण्यात आला असून काल उशिरा त्याला न्यायालयात ही हजर करण्यात आले. त्यातच हा कंटेनर पोलिस ठाण्यात अर्धा तास लेट आल्याच उपस्थितांकडून सांगितले गेल. त्या अर्ध्या तासात काहीतरी झाल्याचा संशय आहे, असं त्यांचं मत आहे. अर्धा तास गाडी गेलेली कुठे हेच समजलं नाही, पोलिसांकडून गाडी रस्ता चुकल्याच सांगितल गेल्याच घटनास्थळी उपस्थित असणाऱ्याकडून सांगितले गेल. त्यामुळे तो कंटेनर लेट का झाला ? असा सवाल देखील यामुळे उपस्थित होतोय. याबाबत पोलिसांना विचारलं असता, पोलिस ठाण्यात कंटेनर आणताना पोलिस सोबतच होते असं पोलीसांकडून सांगितल गेलं. पोलिसांकडून सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्या टीमला सोडून देण्यात आले. तर कंटेनर चालकाविरुद्ध अवैध रित्या वाहतूक केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे.
याच प्रकरणावरून पोलीसांना मनसेसह, सामाजिक कार्यकर्त्यांनी धारेवर धरत या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. तर यात अंमली पदार्थांच्या तस्करीचा संशय सामाजिक कार्यकर्ते सुनिल पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. तर मनसेचे अँड. राजू कासकर यांनी रविवारी याबाबत भाष्य करणार असल्याच सांगितलं आहे. यामुळे सध्या हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडल असून बड्या राजकीय नेतेमंडळींनी देखील या प्रकरणात लक्ष घातल्याची माहिती मिळत आहे.
एव्हेंटसाठी हा कंटेनर जात होता. मात्र, बाजारपेठेत घडलेल्या घटनेमुळे आतमधील टीम घुसमटल्यानं मुलांनी आरडाओरडा केला. यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज निर्माण होऊनं वाद झाला. पण, कंटेनरमध्ये एव्हेंटसाठी काम करणारी मुलं होती. मुलांनी आरडाओरड व दरवाज वाजवल्यानं येथील काहींचा मुलं पळवून नेत असल्याचा गैरसमज झाला. मात्र, हि मुलं हॉटेलमध्ये असणाऱ्या एव्हेंटसाठी जात होती. कंटेनरमधून वाहतूक केल्यानं संशय येत अफवा पसरत आहे. परंतु, मी स्वतः घटनास्थळी उपस्थित होतो. असा कोणताही प्रकार नसून केवळ एव्हेंटसाठीच ही टीम जात होती अशी माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
मुलांना जनावरांसारखी कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक होत होती. हे प्रकरण तालुक्यातील शांतता समिती सदस्याशी संबंधित असल्यानं त्यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण गाठले. तालुक्यातीलच शांतता समिती सदस्य जर अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करत असेल तर अशा व्यक्तीला शांतता समितीची सदस्य ठेवण कितपत योग्य आहे ? त्यांना या समितीतून हटविण्यात याव अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनतर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केलीय.
कंटेनर मधून होणारी वाहतूक ही संशयास्पदच आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वतः पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी लक्ष घालत तपास करावा व कंटेनरमधून मुलांना का नेले जात होत, याच सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी पोलिस अधिक्षकांकडे करणार असल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख सुधीर राऊळ यांनी दिली.
एकंदरीत, लग्नसोहळ्याला जाणारी टीम व कंटेनरमध्ये असणार कॅटरिंगच सामान त्यामुळे ही टीम सोहळ्यासाठीच आली असल्याच प्रथमदर्शनी निदर्शनास येते. परंतु, मुंबईतून आलेली ही मंडळी दोन दिवस रेल्वेस्थानकाशेजारील हॉटेलमध्ये वस्तीला आहेत. पण, केवळ १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या हॉटेलमध्ये जात असताना केवळ पैसे वाचवण्यासाठी पूर्णतः बंद मालवाहू कंटेनरमधून ही टीम प्रवास करते हे संशयास्पद वाटणार असून शांतता समिती सदस्य व शहरातील एका व्यवसायिकाशी संबंधित हा सोहळा असताना कंटेनर मधून प्रवास करण्याची वेळ या टीमवर का आली ? हा देखील सवालच आहे. सध्यातरी पैसे वाचवायचा नादात केलेल्या या कंटेनर सफरीमुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलं असून निर्माण झालेल्या संशय कल्लोळामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कंटेनर सफरीमागील नेमकं सत्य काय ? या सवालाचं उत्तर कोण देतंय, याचीच उत्सुकता आहे.