सिझन जत्रांचा..!

Edited by: ब्युरो
Published on: December 08, 2022 15:14 PM
views 381  views

दिवाळी संपली की त्यानंतर सिझन सुरू होतो तो म्हणजे जत्रांचा ! आपल्या कोकणात वेगवेगळ्या ग्राम देवतांच्या जत्रा पहावयास मिळतात. जत्रेत फिरायचा अनुभव हा खूप सुंदर व आगळावेगळा असतो. त्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येतात. शिस्तबद्ध रांगेत उभे राहून सर्वजण देवदर्शन घेतात. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन नारळ, केळी, फुले, अगरबत्त्या इ. देवाला अर्पण करतात. तेथील भटजी गाऱ्हाणे घालतात. मंदिराच्या आवारात सर्वत्र फुले व अगरबत्त्याचा सुगंध पसरलेला असतो. लाऊड स्पीकर वर भक्तिसंगीत लावलं जातं. एकूणच वातावरण खूप भारावलेलं व मन मंत्रमुग्ध करणारं असतं. लोक मोठ्या भक्तिभावाने आलेले असतात. एक प्रकारचं उत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळतं.

          देवदर्शन झालं की नंतर महत्त्वाची खरेदी म्हणजे खाजं. गुळाचं आणि साखरेचं अशी दोन प्रकारचे खाजे असलेली दुकाने असतात. याच दुकानात नरम बुंदीचे लाडू, तिळाचे लाडू,चिक्की, सुतरफेणी, घिवर, हलवा, आवळा पेठा इ. गोष्टीही दिसून येतात. लोक आपल्या आवडीनुसार खरेदी करतात. लहान मुलांची ओढ खेळण्यांच्या दुकानाकडे असते.विविध प्रकारचे खेळण्यांचे स्टॉल्स असतात. तसेच रंगीबेरंगी फुगे घेऊन फुगेवाले फिरत असतात. तरुण मुलींची ओढ कानातले डुल, बांगड्या,नेकलेस इ. च्या खरेदी कडे असते.त्यासाठी विविध आकर्षक दुकाने व लायटिंग असते. काही व्यावसायिक खास जत्रा करीत फिरत असतात. आज या गावातून उद्या त्या गावात अशी त्यांची संपूर्ण बिऱ्हाडं फिरताना दिसून येतात.तसेच काही स्थानिक लोक पण दुकाने लावतात.

          नंतर महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे खाण्याच्या पदार्थांचा!जत्रेत खाण्याच्या दुकानांचीही तशीच रेलचेल दिसून येते. गोबी मंचुरीयन, चायनीज भेळ, शेजवान फ्राइड राईस, न्युडल्स असतात.तर काही ठिकाणी कांदा भजी, बटाटा भजी, समोसे, पावभाजी, मिसळ, वडापाव याची दुकाने असतात. भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पुरी, दाबेली इ.चेही स्टॉल्स असतात. काही आईस्क्रीम ची दुकानेही पहायला मिळतात. थंडी खूप असली तरी आईस्क्रीम खायची मजा काही औरच असते. लोक आपआपल्या आवडीप्रमाणे खाऊ शकतात.

          रात्री उशिरा एका बाजूला स्टेज वर दशावतारी नाटकाचा खेळ सुरू होतो. ही लोककला आजही इथल्या मातीने जपलेली आहे .खूप मनोरंजक असे हे नाटक असते. आणि रात्री भरलेली ही जत्रा जवळपास पहाटेपर्यंत चालते.खूप रोमांचकारी आणि विलोभनीय असा अनुभव जत्रेतील प्रत्येकाला मिळतो. मुंबई, पुणे येथे राहणारे कोकणस्थित लोकही मोठ्या हौसेने आणि आवडीने येथे हजेरी लावतात. वेगवेगळ्या देवस्थानच्या या वैशिष्ट्यपूर्ण जत्रा एक आगळा अनुभव दिल्याशिवाय राहत नाहीत.ल हानथोर सर्वांसाठी जत्रा हे एक आकर्षण असते.

स्वप्ना गोवेकर

सावंतवाडी