International Chefs Day Special | जेवण बनवताना शेफ टोपी का घालतात ?

२१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर केला होता पहिला कुकरी शो
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 20, 2022 09:51 AM
views 247  views



दर वर्षी २० ऑक्टोबर रोजी 'इंटरनॅशनल शेफ डे' साजरा केला जातो. हा दिवस २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थे तर्फे साजरा केला जातो. WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली.



स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून, प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच. शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं. 



निरनिराळी हॉटेल्स, त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफ स्टाइलचा एक भाग बनला आहे. काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात. शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात. त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात. एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही. कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे. त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.


व्यावसायिक पद्धतीने जेवण बनवणारी व्यक्ती म्हणजे मुख्य स्वयंपाकी (आचारी, शेफ). सॅलड्स, सूप, मासे, मटण, भाज्या, पक्वान्नं किंवा इतर पदार्थ बनविण्याची तयारी करून घेण्याचं काम शेफचं असतं. त्याचप्रमाणे मेन्यू आणि त्याच्या किंमती ठरवणे, माल ऑर्डर करणं, रेकॉर्ड्स आणि अकाऊंट्स ठेवणं याही जबाबदाऱ्या त्याच्याच असतात. जेवणाची तयारी करणं आणि ते तयार करणं यात त्याचा प्रमुख सहभाग असतो. ऑर्डरनुसार आलेल्या प्रत्येक मालाची तपासणी करणे, त्याचा दर्जा तपासणं या कामावरही त्याचं लक्ष असलं पाहिजे.


करीयरसाठी चांगली संधी :


पात्रता : दहावी किंवा बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करता येतो किंवा बारावीनंतर बॅचलर ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड कुलिनरी आर्ट्स किंवा कुलिनरी आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करता येईल.


नोकरीच्या संधी : हॉटेल/रेस्टॉरण्ट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपनी, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरण्ट, मॉल्स, बेस किचन, खासगी हॉस्पिटल्स, क्रूझ लायनर्स, कॉर्पोरेट केटरिंग, इत्यादी. काही वर्षांच्या अनुभवानंतर फूड रायटर किंवा क्रिटीक किंवा शिक्षक म्हणून काम करता येईल. स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करता येईल. जगात भारतीय खाद्यपदार्थांना बाहेरही मोठी मागणी असल्याने बाहेरही नशीब आजमावता येईल. बाहरील देशात भारतीय रेस्टॉरण्ट्सची संख्या प्रचंड मोठी आहे.


शेफचे प्रकार : खासगी किंवा वैयक्तिक शेफ, एक्झिक्युटिव्ह शेफ/मुख्य शेफ, स्यूस शेफ, स्टेशन शेफ, शेफ डे पार्टी, पॅस्ट्री शेफ (पॅटीसीअर), साऊट शेफ (सॉसिअर), फिश शेफ (पॉयजनियर), व्हेजिटेबल शेफ (एण्ट्रेमीटिअर ग्रिल शेफ), ग्रिलार्डीन, क्रूझ शेफ.


२१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर पहिला कुकरी शो केला. राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला, त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.