आडी : आवड असल्यास जगातील कोणतेही अवघड विषय अभ्यासाने समजून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे अध्यात्माविषयी आवड असल्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान समजणे सोपे होते. आत्मस्वरूप सर्व व्यापक आहे. सर्वत्र व्याप्त चैतन्य नेहमीसाठी एकच आहे. मोक्ष लाभासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी दत्त मंदिरात श्री. दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, आत्मस्वरूपा संबंधीचा विचार म्हणजे अध्यात्म होय. एका व्यक्तीची सावली त्या व्यक्तीपेक्षा मोठी पडली असताना त्या व्यक्तीला ती सावली मी मोठी म्हणून अभिमानाने हिणवत आहे, असा भास झाला. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, थांब थोडा वेळ सूर्य डोक्यावर येऊ दे. सावलीशी बोलणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून एका साधूने सांगितले की सावली अस्थिर आहे. परंतु तिला अभिमान झाला आहे. फक्त ती सावलीच नाही तर हा देह सुद्धा अस्थिर असून या देहाचा तुला अभिमान झाला आहे. देह अस्थिर आहे. तो वाढतो, मोठा होतो आणि एके दिवशी संपून जातो. देहाचे अधिष्ठान आत्मस्वरूप आहे. वेदांतात आत्मा सर्वव्यापक आहे असे मानले जाते.
या परिसरात 5 मे व 6 मे चा दिवस शून्य छायेचा दिवस आहे. काही क्षणासाठी सावलीचा पाठलाग नाहीसा होतो. या गोष्टीचा आनंद काही क्षणासाठी व्यक्त केला जातो. अज्ञानापासून सुटका करून घेण्यासाठी अध्यात्मज्ञान प्रयत्नाने प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाने होणारा आनंद हा अनंतकाळासाठी लाभणारा असतो. स्वप्नात इंधन जळताना दिसल्याने ही मरणाची चिन्हे आहेत, असे समजून स्वतःच्या मृतदेहाच्या दहनासाठी इंधन गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला एका साधूने सांगितले की, भविष्यातील स्वतः च्या मृतदेहाच्या दहनासाठी इंधन गोळा करण्याऐवजी अज्ञानाला जाळणारे इंधन गोळा कर. या बोधवाक्याने त्या व्यक्तीला वैराग्य प्राप्त झाले. त्याने साधना केली. त्याचा उद्धार झाला. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्तीरूपी इंधन गोळा करा. मृतदेहाला दफन करा अथवा दहन करा. केवळ या क्रियांवर त्याचा उद्धार अवलंबून नाही. तर त्याने केलेल्या सत्कर्मांमुळे त्याला सुख मिळू शकते. साधनेवर त्याचा उद्धार अवलंबून असतो. व्यक्तीचे कर्म त्याला पुढील गती देत असते. हिंदूचा, मुस्लिमांचा तसेच इतरांचा आत्मा वेगळा नाही. एक चौरस किलोमीटर अंतरात अब्जावधी जीव राहत असतात. त्या जीवांचे चैतन्य वेगळे नाही. प्रत्येक जीवाचे मन-बुद्धी-चित्त- अहंकार रूप अन्तःकरण हे वेगवेगळे आहे. त्यामुळे जीवांमध्ये एकमेकांपासून आपण वेगळे असल्याचा भास होतो. तत्वतः चैतन्य एकच आहे. ज्ञानी व्यक्ती सोडून इतर सर्वांना स्वर्गद्वार व नरकद्वार या दोन्ही द्वारातून जावे लागते. आत्मस्वरूप जाणून घेतल्यास स्वर्ग व नरकात जाण्याची गरज भासणार नाही. ज्ञानी विमुक्त असतो. स्थिर असलेले सर्वव्यापक आत्मस्वरूप जाणून घेतल्याने मोक्ष मिळतो. अद्वैतवेदांतात एकच सत् मानतात. उरलेले आयुष्य हाच उद्धाराचा मुहूर्त आहे. कर्मांनी बद्ध जीवांना जन्ममरण चालू असते. आत्मस्वरूपाचे म्हणजेच सर्वव्यापक चैतन्यस्वरूपाचे स्थिरत्व नित्यसिद्ध आहे.
वैशाख पौर्णिमेला कूर्म अवतार झाला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. अध्यात्मशास्त्र समुद्रासारखे व्यापक आहे. जगत् हे सतत चालू राहते. जगत् जड आहे. ते आत्मस्वरूपावर अधिष्ठित आहे. आत्म स्वरूपाची स्थिर व्याप्ती समजून घेणे महत्त्वाचे आहे. अज्ञानरूपी चोराला रोखण्यासाठी भक्तीरूपी तलवारीला ज्ञानरूपी धार देऊन उगारणे आवश्यक आहे. मोक्ष लाभासाठी आत्मस्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. यावेळी अविनाश सुधाकर आंबले निपाणी यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी उमा रघुनाथ वाशीकर हुपरी, सौरभ वसंत कोरव यमगर्णी, काकासो हेगाजे सुळकुड, अक्षय मोरे उजळाईवाडी, चंद्रकांत पाटील बुदीहाळ, दिलीप पाटील खेबवडे, राजेंद्र पाटील खेबवडे, खुशी शंकर खोत कोडणी, दत्तात्रय पाटील म्हाकवे, पांडुरंग कुंभार यमगर्णी, उद्योगपती पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर, उषा नाईक आडी आदी मान्यवर व देणगीदार भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.