मला पैसे नकोत, माझ्या पायावर पुन्हा उभं राहण्यासाठी ताकद द्या !

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅपनं पूर्ण केलं तिचं स्वप्न !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2023 13:09 PM
views 253  views

सावंतवाडी : मला पैसे नकोत, माझ्या पायावर पुन्हा उभं राहण्यासाठी ताकद द्या, अशी भावना मदतीसाठी सरसावलेल्या  सामाजिक बांधिलकीकडे वयाच्या सहाव्या वर्षांनंतर अचानक अपंगत्वाला सामोर जावं लागलेल्या हर्षदा वाडेकर या मुलीनं केली होती. मदतीचा हात नको तर स्वतःच्या पायावर उभं राहायची हिंमत अन् ताकद द्या अशी तिची विनंती होती. त्यानुसार सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून व  हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप, कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून हर्षदाला व्हिल चेअर प्रदान करण्यात आली आहे. हर्षदान स्वतःच्या पायावर उभं राहत अपंगत्वावर मात करावी यासाठी तिला केलीली मदत आहे. नक्कीच ती जिद्दीनं यावर मात करेल अशी भावना यावेळी सामाजिक बांधिलकी व हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


भटवाडी येथील वाडेकर कुटुंब दुःखातून सावरण्या आधीच नवं संकट त्यांच्यासमोर उभ ठाकल. वयाच्या सहाव्या वर्षी अचानक ताप येऊन हर्षदाच्या नशीबी अपंगत्व येऊन चालण बंद झालं. त्यातच अठरा वर्षांपूर्वी वडीलांचा आधार हरपला. सहा वर्षांपूर्वी भाऊ एक्सीडेंटमध्ये गमावला. दुःखांचा डोंगर या माय-लेकींवर कोसळला. सामाजिक बांधिलकीला याची कल्पना येथील रहिवाशांनी दिली. अन हर्षदाला मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक बांधिलकी सरसावली. पण, मदतीसाठी आलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना मला पैसे नकोत, मला माझ्या पायावर पुन्हा उभं राहण्यासाठी ताकद द्या अशी विनंती केली. यानंतर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हर्षदा ला तीच्या पायावर उभं करण्याची शपथ घेतली.


वयाच्या सहाव्या वर्षी अपंगत्व आलेल असताना डॉक्टरांनी सांगितलेल "हि जास्त काळ जगू शकत नाही तिला चांगलं चांगलं खायला द्या" हेच वाक्य तीच्या डोक्यामध्ये अजूनही घर करून राहिलं आहे. आज ती 21 वर्षाची असून "मी एक ना एक दिवस नक्कीच चालेन" हा आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तीन टी.वाय.बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षापर्यंत येऊन पोहचली. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने तिच्यावर योग्य ट्रीटमेंट होऊ शकली नाही. भटवाडी परिसरातील लोकांनी त्यांना आर्थिक हातभार दिला. कित्येक वर्ष ती भटवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार यांनी या घटनेची माहिती देताच त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीची टीम पोहचली. सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. "आर्थिक मदत नको परंतु मला माझ्या स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी मला ताकद द्या. मला माझी परिस्थिती सावरायची आहे‌. त्यासाठी मला जॉब करायचा आहे. मला त्यासाठी मला आपली साथ हवी आहे. द्याल ना..असं सांगून ती भावुक झाली. यानंतर सामाजिक बांधिलकीचे सेवानिवृत्त प्रा. सतीश बागवे यांनी त्या मुलीला  सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योग्य ट्रीटमेंट मिळावी यासाठी प्रयत्न करूच परंतु शिक्षणाला मदत व कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेऊन देऊ असं सांगून तिचा आत्मविश्वास वाढवला. कित्येक दिवसांनी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून

तिच्या आईला अश्रू अनावर झाले. सामाजिक कार्यकर्त्या समीरा खालील यांनी त्यांना धीर दिला व आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले. तसेच हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूरचे विश्वस्त श्रीमती रेखा देसाई, भीमराव हळदीकर, सौ सुजाता गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत हर्षदा वाडेकर हिला आज शुक्रवारी व्हीलचेअर प्रदान केली. यावेळी हर्षदा व तिच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून गेले. सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, समीरा खलील, शेखर सुभेदार, साधले सर, प्रा. सतीश बागवे ,प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, शाम हळदणकर ,शेखर सुभेदार व शरद पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. या सर्व मंडळीनी हर्षदाला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.