किल्ले हनुमंत गडाला नवी झळाळी देण्यासाठीच्या रथयात्रेला उदंड प्रतिसाद

25 डिसेंबरला दिमाखात होणार स्मारकाचा जीर्णोद्धार व तोफगाडा लोकार्पण सोहळा !
Edited by: संदीप देसाई
Published on: December 21, 2022 20:21 PM
views 315  views

दोडामार्ग : तालुक्यातील किल्ले हनुमंत गडाला नवी झळाळी देण्यासाठी शिवप्रेमीनी घेतलेल्या पुढाकारला नागरिक व शिवप्रेमीमधून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्ताने बुधवार पासून तीन दिवस जिल्हाभर फिरणाऱ्या रथयात्रेचा दोडामार्ग शहरातून शुभारंभ करण्यात आला असून पुढील ३ दिवस हा रथ जिल्हाभर फिरणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील गावोगावी या रथयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. 

 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग, दुर्गसेवक, श्री देवी माऊली युवा मंडळ फुकेरी आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून २५ डिसेंबरला फुकेरी येथील किल्ले हनुमंत गडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजाच्या स्मारकाचा जीर्णोद्धार व तोफगाडा लोकार्पण सोहळा होणार आहे. यनिमित्ताने हा किल्ला प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत पोहचवा यासाठी आजपासून रथयात्रा निघाली आहे. रथयात्रेचा शुभारंभ दोडामार्ग गांधी चौकातुन करण्यात आला. यावेळी संह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अखिल मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सोनू गवस, भारत माताकी जय संघटनेचे गणेश गावडे, जेष्ठ नाट्य दिग्दर्शक व कलाकार गोविंद महाले, युवा नाट्य दिग्दर्शक व कलाकार गणेश ठाकूर, शिवप्रेमी प्रकाश गवस, बाबुराव धुरी, आनंद रेडकर तसेच महिला भगिनी व अन्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आरती ओवाळून शिवयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.


यानंतर साटेली-भेडशी, झरेबांबर, पिकूळे, तळेखोल, सासोली, कळणे, आडाळी येथे गेलेल्या या रथयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. शिवप्रेमी व नागरिकानी या रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केलं.  उद्या ही रथयात्रा  बांदा व पुढे वेंगुर्ला, कुडाळ ते मालवण पर्यंत जाणार आहे. जिल्हाभर तीन दिवस होणाऱ्या भव्यदिव्य शिवरथयात्रेला बुधवारी सुरुवात झाली. फुकेरी येथील हनुमंत गडाच्या संवर्धनासाठी निधी संकलन करण्यात येत आहे. प्रत्यके व्यक्तीने या शिवकार्याला आर्थिक मदतीचा हात पुढे करून सहकार्य करावे असे आवाहन संह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.