''प्रतिज्ञा" आरोग्याची ; जनहक्काची !

यंत्रणा कोलमडलेली ; सेवेतील डॉक्टरांवर ताण !
Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 12:18 PM
views 136  views

▪️ आरोग्य मंत्र्यांचेही दुर्लक्ष ?

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. राज्यातील सरकारं, आरोग्य मंत्र्यांच्या खूर्चीतील चेहरे बदलले. मात्र, कोलमडलेली यंत्रणा काही सुधारण्याचं नाव घेत नाही. सेवेत असलेल्या डॉक्टरांवर प्रचंड ताण येत असून यात गोरगरीब रुग्ण मात्र पोळले जात आहेत,उपचारांविना जीव गमावत आहे. नुकतेच, कोल्हापूर सर्क्रीट बेंचकडून याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यात लक्ष घालण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिलेत. या पार्श्वभूमीवर आरोग्याची कोलमडलेली ही परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने 2013 ला जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. नुकतीच कोल्हापूर सर्क्रीट बेंच समोर याची सुनावणी पार पडली. यात  महामार्गावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (I.C.U.) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा आरोग्य विभागाच्यावतीने  करण्यात आला होता. यासंदर्भात या आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती जम.एस.कर्णीक आणि न्यायमूर्ती शर्मीला देशमुख यांनी दिलेत. शासनाच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनाही यात लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. यासंदर्भात न्यायमूर्तींनी सुनावणीसाठी येणारी 25 सप्टेंबर ही तारीख दिली असून यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. सरकारी वकिलांनी यासाठी एका आठवड्याचा अवधी मागितला होता. सावंतवाडी येथे आय.सी.यु. आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित झाल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबतचे प्रतिज्ञापत्र उद्या सादर केलं जाणार आहे. 

आरोग्य विभाग आय.सी.यु., ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा करते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. यामुळेच गोवा-बांबोळी येथे पाठवले जाणारे रूग्ण अधिक आहेत. प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालयात मंजूर पदांची माहिती घेतली असता आजमीतीला वैद्यकीय अधिक्षक हेच पद रिक्त आहे. डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे प्रभारी म्हणून हा कारभार सांभाळत आहे‌. 100 बेडेड रूग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 20 पद आकृतीबंधात मंजूर असताना त्यातील 11 पद ही रिक्त आहेत. तर भरलेल्या 9 पैकी 2 वैद्यकीय अधिकारी 2015 पासून 10 वर्ष गैरहजर आहेत. त्यामुळे केवळ 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर हे रूग्णालय चालत आहे. याचा प्रचंड ताण सेवेत असलेल्या डॉक्टरांवर आहे. हार्ट फिजीशीयन सारखं महत्वाचं पदही रिक्त असून न्युरोलॉजिस्ट पद आकृतीबंधात नाही. त्यामुळे मोठी हानी रूग्णांची होत आहे. सरतेशेवटी या रुग्णांना गोवा बांबोळी शिवाय अन्य पर्याय उरत नाही. 


दिवसाला 6 रूग्ण होतात रेफर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातून गेल्या चार महिन्यात 745 रुग्ण गोवा-बांबोळी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेत. दिवसाला 6 रुग्ण रेफर होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. हा आकडा 108 रुग्णवाहिकेने दाखल केलेल्या रुग्णांचा असून अन्य खासगी वाहनाने गेलेले रुग्ण यात नाहीत. अन्यथा, हा आकडा अधिकच वाढेल.


ट्रामा केअरची पद रिक्त !

ज्या ट्रामा केअर युनिटचा उल्लेख सुनावणी दरम्यान झाला. त्याच भीषण वास्तव समोर आलं आहे. ट्राम केअरची मंजूर 5 ही पदे रिक्त आहेत. यामुळे अस्थिव्यंग तज्ञांना दोन्हीकडे धावाधाव करावी लागत आहे. भुलतज्ञ रिक्त असल्याने कुडाळवरून प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. स्मिता पंडीत व डॉ. तेजस्विनी आवळे यांच्या माध्यमातून हा कारभार सुरू आहे. तर वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ ची दोन्ही पद रिक्तच आहेत. 


कंत्राटी अधिकारी देतात सेवा !

दरम्यान, 11 महिन्यांसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून 10 डॉक्टर इथे सेवेत आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार यांसह इतरांचा यात समावेश आहे. तसेच ''ऑन कॉल'' तत्वावर भुलतज्ञ डॉ. क्षमा देशपांडे, फिजीशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर, डॉ. अभिजित चितारी तर डायलेसीसची डॉ. शंतनु तेंडुलकर सेवा देत आहेत.


नित्य सेवेत असणाऱ्यांवर ताण !

नियमीत सेवेत असणारे स्त्री रोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सर्जन डॉ. पांडुरंग वजराटकर, बालरोग तज डॉ. प्रवीण देसाई, अथिव्यगतज्ञ डॉ. निखिल अवधूत, दंतशल्य चिकित्सक डॉ. हुमायुन मणेर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. आकाश ऐडके 24×7 चांगली सेवा देत आहेत. मात्र, येणाऱ्या अतिरिक्त ताणाला त्यांना सामोरं जावं लागतं आहे. प्रसंगी रूग्णांच्या रोषाला देखील तोंड द्यावं लागतं असून याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. 

'ते' डॉक्टर जावई लागतात का ?

यातील दोन वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.ए. सय्यद व डॉ. ए. यु. सय्यद दिनांक 1 ऑक्टोबर 2015 पासून गैरहजर आहेत. गेली 10 वर्ष केवळ ते यादीतच दिसत आहे. शासनाला कळवूनही नावापुरती भरलेली पदे तशीच आहे. या ठिकाणी अन्य वैद्यकीय अधिकारी भरले जात नसल्याने हे डॉक्टर शासनाचे जावई लागतात का ? असा सवाल देखील येथील जनता विचारत आहे.

रूग्णांना मोफत सेवेचा फायदा

सी.टी.स्कॅन,एक्स-रेसह इतर खर्चीक सुविधा इथे मोफत मिळत आहेत. मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होते. मात्र, काही पदच रिक्त असल्याने तो फायदा गोरगरीब रुग्णांना मिळत नाही. जिल्हा रूग्णालयाच्या तुलनेत इथे मिळणारी सेवाही चांगली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातून गोरगरीब जनता येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येते. परंतु, कोलमडलेल्या यंत्रणेचा फटका त्यांना सहन करावा लागतो. 

का हजर होत नाहीत डॉक्टर ?

शासन आदेशानंतरही काही डॉक्टर इथे हजर होत नाहीत. बऱ्याचदा नियुक्ती करूनही ते हजर झालेले दिसत नाहीत. त्यांना मिळणार मानधन, या ठिकाणी त्यांच्या लाईफस्टाईल प्रमाणे नसणाऱ्या सुविधा यामुळे व अतिरिक्त पडणारा ताण बघता ते इथे हजर होत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. शासनाने यासाठी विशेष धोरण अंमलात आणून येथील रुग्णांना कायमचा दिलासा देणे काळाची गरज आहे.

उपदेश कशासाठी ?

यातच, काही नेत्यांनी रुग्णालयाच्या बाबतीत सकारात्मक पत्रकारितेचे उपदेशाचे डोस पाजलेत‌. आपल्या सरकारच, नेत्यांच अपयश झाकण्यासाठी त्यांनी हे  उपदेशाचे दिल्याचे बोलल जात आहे. इथला भूमिपूत्र उपचारांसाठी गोव्यात जाऊन मरण पावत असताना, रिक्तपद भरली जात नसताना सकारात्मक पत्रकारिता नेमकी कशासाठी ? हा सवाल आहे. आरोग्यासाठी आपल्या माणसांचा जीव वाचविण्यासाठी होणारी अवस्था ''ज्याच जळत, त्यालाच कळत'' अशी आहे‌. त्यामुळे ही समस्या कायमची मिटवण्यासाठी नेत्यांनी उपदेशापेक्षा परिस्थिती सुधारण्यावर भर देण आवश्यक आहे.

शल्य चिकित्सकांकडून नाही प्रतिसाद !

या परिस्थितीबाबत विचारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे रजेवर असल्याचे समजले. पदभार सांभाळणारे डॉ. गिरीश चौगुले म्हणाले, सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही रूग्णांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. दिवस-रात्र याचा विचार न करता सेवा देत आहोत. तर गैरहजर असलेल्या डॉक्टरांबाबत शासनाना वेळोवेळी कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

एकंदरीतच, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतरही आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांचे दुर्लक्ष जिल्ह्याकडे झालेलं दिसतं आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घेणं आवश्यक आहे. ग्रामीण, दुर्गम भागांचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कारण, विषय लाखमोलाच्या आयुष्याचा आहे. तसेच स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी मंत्रालयात स्तरावरून हा प्रश्न हाताळत पद भरती करत एक सक्षम, जीवनदायी ठरणारी आरोग्य यंत्रणा उभी करण्याची प्रतिज्ञा करणं काळाची गरज आहे.

''आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची गरज आहे. रुग्णालयात आवश्यक सोयीसुविधा आणि पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत आहे. येथे सेवा देणाऱ्या अनेक कंत्राटी डॉक्टरांची स्वतःची खासगी रुग्णालये असून ते तिथे पूर्ण वेळ देतात आणि उपजिल्हा रुग्णालयात फक्त काही तास सेवा देतात''

 - वसंत उर्फ अण्णा केसरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

"आरोग्यमंत्र्यांना आम्ही स्वतः भेटून पाठपुरावा केला होता. आमदार, खासदार, पालकमंत्री यांचे लक्ष वेधले, त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्याप परिस्थिती बदललेली नाही. नियुक्तीनंतरही डॉक्टर हजर होत नाहीत. सध्या, फिजीशीयनसह इतर रिक्तपद भरणं आवश्यक आहे.'' 

- देव्या सुर्याजी, सदस्य, रूग्ण कल्याण समिती


विनायक गांवस, सावंतवाडी प्रतिनिधी, कोकणसाद LIVE