GOLD RATES | उंच उंच गुढी सोनेदराची !

जागतिक पातळीवरच्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 21, 2023 19:14 PM
views 267  views

ब्युरो न्युज : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात सोमवारी प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये बघायला मिळत आहे.

सोन्याचा भाव याआधी बाजार चालू असलेल्या दिवशी ५८ हजार ७०० रुपये होता. आता राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने आतापर्यंतची विक्रमी कामगिरी केली आहे. चांदीच्या दरानेही सोमवारी मोठी उसळी घेत प्रतिकिलो १ हजार ८६० रुपयांची वाढ नोंदविली. त्यामुळे चांदीचा दरही ६९ हजार ३४० रुपयांवर पोहोचला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, की दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमसाठी ६० हजार १०० रुपयांवर गेला. त्यात सुमारे १ हजार ४०० रुपयांची वाढ दिसून आली.

जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ५ डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस २२.५५ डॉलर होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसच्या कमोडिटी संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, बँकिंग संकटामुळे जगभरातील भांडवली बाजारांना धक्का बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढला आहे. याचाच परिणाम होऊन सोन्याची वाटचाल मागील तीन वर्षांतील सर्वात मोठी भाववाढ नोंदवण्याच्या दिशेने सुरू आहे.