गोव्याच्या पर्यटन खात्याचा युवराज सिंगला दणका !

मोरजीतील बंगल्याची नोंदणी पर्यटन व्यवसायासाठी न केल्याने नोटीस
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 23, 2022 15:36 PM
views 335  views

पणजी : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग त्याचा वरचावाडा-मोरजी (पेडणे) येथील बंगला व्यावसायिक कारणासाठी वापरत आहे. परंतु, त्याने या बंगल्याची नोंदणी पर्यटन खात्याकडे केलेली नाही असा दावा करीत, खात्याने त्याला नोटीस जारी केली आहे. शिवाय, येत्या ८ डिसेंबर रोजी या प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
युवराज सिंग याचा मोरजी येथील बंगला ‘होम स्टे’ म्हणून वापरला जात आहे. सहा जणांच्या गटाला या बंगल्यात राहता येईल. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्याचे आवाहनही त्याने २१ सप्टेंबर २०२२ रोजी ट्विटरद्वारे केले आहे. परंतु, बंगल्याचा अशाप्रकारे व्यावसायिक वापर करताना त्याची राज्य पर्यटन खात्याकडे अधिकृत नोंदणी करणे ‘गोवा पर्यटन व्यवसाय कायदा १९८२’ नुसार बंधनकारक असते. पण, युवराज सिंग याने तशी नोंदणी केलेली​ नाही. पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ११ नोव्हेंबर रोजी बंगल्याच्या केलेल्या पाहणीवेळी देखील ही बाब समोर आलेली आहे. यासंदर्भात ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
दरम्यान, युवराज सिंग याने गोव्यात बंगला घेतल्याचे आणि बंगल्यात सहा जणांच्या गटाची निवासासाठी व्यवस्थाही करण्यात आल्याचे युवराज सिंग याने जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणही काही काळ तापले होते. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने यावरून सत्ताधारी भाजपसह युवराज सिंग याच्यावरही निशाणा साधला होता.

युवराज सिंग याच्याप्रमाणेच अनेक बॉलीवूड स्टार तसेच क्रिकेटपटूंचे गोवा ‘सेकंड होम’ आहे. त्यातील काहीजणांकडून परस्पररीत्या त्यांच्या बंगल्यांचा वापर व्यावसायिक कामासाठी केला जातो. परंतु, त्याची नोंद मात्र सरकार दरबारी केली जात नाही. पर्यटन खात्याने अशा प्रकरणात आता युवराज सिंग याला दणका दिलेला असल्याने इतरांकडून तत्काळ नोंदणी होण्याची शक्यता खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली​.